टेंभुर्णी : शंभर टक्के बागायती क्षेत्र असलेल्या शिवरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पारंपरिक दोन गटांत चुरशीची लढत आहे. येथील शंभर कुटुंबांना घरकुल मंजूर असूनही त्यांना त्यांच्या मालकीची जागा नसल्याने प्रलंबित घरकुलाचा प्रश्न, वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा अभाव हे येथील निवडणुकीतील कळीचे मुद्दे ठरले आहेत.
शिवरे येथे राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत जय हनुमान ग्रामीण विकास आघाडी व भाजपप्रणीत शेवरे ग्राम विकास आघाडी या दोन पारंपरिक आघाड्यांमध्ये सरळ चुरशीची लढत आहे. मागील वेळेस राष्ट्रवादीमधील दोन गट वेगवेगळे लढल्याने तिहेरी लढत झाली होती. परंतु या वेळेस राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आल्याने आता दुहेरी लढत होत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला आहे.
जय हनुमान ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व ब्रह्मदेव मस्के, समाधान मस्के व आगतराव कांबळे हे तीन माजी सरपंच करीत आहेत. शेवरे ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व हरिभाऊ खताळ, अंकुश मस्के, उत्तरेश्वर मस्के हे तीन माजी सरपंच, भाजपचे माजी जिल्हा चिटणीस प्रवीण मस्के ,गोरख गायकवाड, तानाजी मस्के व गणेश साळुंखे करीत आहेत.
शंभर टक्के बागायती क्षेत्र असलेले शेवरे हे ३२०० लोकसंख्या असलेले माढा व माळशिरस तालुक्याच्या सीमेवर भीमा नदीकाठावरील गाव आहे. जुने शेवरे गाव भीमा नदी पूररेषेत येत असल्याने लोकांचे उंच ठिकाणावर स्थलांतर करण्यात आले आहे. परंतु स्थलांतरित लोकांना गावठाण वाढू न दिल्याने लोक गायरानात अतिक्रमण करून राहत आहेत. वाड्या-वस्त्यांवरून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यास रस्ते नाहीत. त्यामुळे वाढीव गावठाण व रस्ते हा येथील निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरणार आहे.
---
दृष्टिक्षेपात
लोकसंख्या : ३२००
मतदान : २२६५
.सदस्य संख्या : ९