शिक्षण विभागाने शिक्षकांच्या गाव पातळीवर कोविड सर्वेक्षण, चेक पोस्ट, कोविड सेंटर, लसीकरण, रेशन दुकान इत्यादी विविध ठिकाणी नियुक्त्या केल्या आहेत. हे शिक्षक कर्तव्य बजावत असताना अनेक ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह होऊन अनेकांचे दुर्दैवाने निधन झाले. परंतु राज्य सरकारने या शिक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा कवच दिलेले नाहीत. तसेच शासनाच्या परिपत्रकामध्ये शिक्षकांचा नामोल्लेख नसल्याने हा शिक्षकांवर अन्याय होत आहे.
राष्ट्रीय आपत्ती म्हणून सर्व शिक्षक कर्मचारी आपल्या आदेशाचे पालन करून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर करावे. सर्व कोरोना वॉरियर्स व त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.