अक्कलकोट : खानापूर येथील भीमा नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू होता. तहसीलदार अंजली मरोड आणि त्यांच्या पथकाने कारवाई करून चार लाखांची वाळू जप्त केली आहे. मात्र, या निमित्ताने सँड लॉबी सक्रिय झाल्याचे पुढे आले असून, या लॉबीवर नियंत्रण आणण्याचा प्रश्न प्रशासनापुढे उपस्थित झाला आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वत्र वाळू उपसा बंद आहे. मात्र, खानापूर येथून रात्रीत वाळू उपसा व्हायचा. तहसीलदार अंजली मरोड या रजेवर जात असताना मागील महिन्यात प्रशिक्षणार्थी अंकीत तहसीलदार यांनी पदभार घेतला होता. परिणामत: या कालावधीत रात्रीच्या वेळी खानापूर येथून बेसुमार वाळू उपसा सुरू झाला. १ फेब्रुवारी रोजी रात्री कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली. या कारवाईत तीन लाख ८५ हजारांचा ५५ ब्रास वाळू साठा जप्त केला. हा वाळू साठा जेसीबीच्या मदतीने हायवामधून तडवळ येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आला.
प्रभारी मंडल अधिकारी राणा वाघमारे, तलाठी एम. एम. कोळी, बसवराज कुंभार, कोतवाल औदसिद्ध पुजारी, शिवशरण कोळी, जगन्नाथ देसाई यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला.
--
महिनाभरापासून सुरू होता वाळू उपसा
तहसीलदार अंजली मरोड या रजेवर जाताच प्रशिक्षणार्थी तहसीलदार यांनी पदभार घेतला आणि सँड लॉबी सक्रिय झाली. या महिनाभरात अनेकदा चोरून वाळू उपसा झाल्याची चर्चा आहे. या दरम्यान महसूलचे कर्मचारी गप्प कसे राहिले ? असा प्रश्न केला जात आहे. सध्या तहसीलदार मरोड यांनी पदभार घेतला असून त्या यावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
---
फोटो : ०३ खानापूर
खानापूर येथे भीमा नदीपात्रातून चोरून केलेला अवैध वाळू साठा महसूलच्या पथकाने जेसीबीच्या मदतीने आणून शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आणला.