- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सीना नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे. १२९ गावांना पाण्याने वेढा घातला आहे.
यासंदर्भातील पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकारी सध्या सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा भागातील पूरग्रस्त भागांची पाहणी करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सकाळपासूनच माढा, करमाळा तालुक्यात पाहणी दौरा केला. अजित पवार यांनी करमाळा तालुक्यात तर एकनाथ शिंदे हे दुपारनंतर सोलापूर भागातील पाहणी करणार आहेत. गिरीष महाजन यांनी काल रात्रीपासून बार्शी तालुक्यात पाहणी दौरा करीत आहेत. एनडीआरएफ व भारतीय सैन्याची टीम बचाव कार्य करीत आहे. पुराने व्यापलेल्या गावातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने आता शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मंत्र्यांसमोर करीत आहेत.