सोलापूर- मंगळवेढा रोडमुळे तिऱ्हे येथील जिल्हा परिषदेच्या पाच खोल्यांचे पाडकाम करावे लागले. ऐन कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना या शाळा खोल्या पाडण्यात आल्या. चार खोल्या सुस्थितीत आहेत. मात्र, शाळेसमोर पत्र्याचे शॉपिंग सेंटर उभे करून व्यवसाय सुरू केले आहेत. आता शाळा सुरू झाल्यानंतर वर्गात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे लक्षात आले.
मुख्याध्यापकांनी २५ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड व गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार यांना पत्र दिले होते. त्या पत्रात शाळेसमोर पत्र्याचे शाॅपिंग सेंटर उभे केल्याने शाळेचा रस्ता बंद झाल्याचे म्हटले होते. मात्र, २६ नोव्हेंबरच्या पत्राची अधिकाऱ्यांनी २९ जानेवारीपर्यंत दखल घेतली नाही.
शाळा सुरू झाल्यानंतर विजय जाधव व गावकऱ्यांनी आ. सुभाष देशमुख यांच्याकडे २८ जानेवारी रोजी तक्रार केली. आ. देशमुख यांनी
जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दखल घेण्याबाबत सांगितले. विजय जाधव व गावकरी जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना २८ जानेवारी रोजी भेटले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार यांनी उत्तर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना २९ जानेवारी रोजी पत्र दिले असून, खासगी अतिक्रमणामुळे शाळेची अडचण झाली असल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र, २६ नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापकांनी दिलेल्या पत्राची दखल घेतली असती तर जिल्हा परिषदेच्या शाळेची अतिक्रमणातून सुटका झाली असती.
-्---
ग्रामसेवकच गायब...
तिऱ्हे येथून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने लगतच्या शासकीय जागेचा काही भाग संपादन झाला आहे. उर्वरित जागेत गावातील प्रमुखांनीच दुकाने थाटली आहेत. मोक्याच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण होत आहे. मात्र, गावात ग्रामसेवकच नाही, असे सांगण्यात येत आहे.
----