आॅनलाइन लोकमत
सोलापूर, दि ३ : हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने ग्रामीण भागात सुगी आटोपण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू आहे.
ग्रामीण भागात सर्वत्र सध्या सुगीची लगबग सुरू आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा या परिसरात ज्वारी, गहू, हरभरा, करडईची पिके काढणीच्या मार्गावर आहे. ज्वारी काही ठिकाणी हुरड्यावर तर बºयाच ठिकाणी काढणीला आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ, वांगी, हत्तूर, मंद्रुप, औराद, बरूर, भंडारकवठे, औज, वडापूर, आहेरवाडी शिवारात फेरफटका मारल्यावर ज्वारी काढणीची घाई सुरू असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सोशल मीडियावर पावसाचा इशारा फिरू लागल्याने शेतकरीवर्ग सावध झाला आहे. कणसाचे ओझे व वाºयामुळे ज्वारीची धाटे मोडून पडली आहेत. त्यामुळे काढणीला विलंब होत आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकºयांनी शिवारात मुक्काम ठोकून पहाटेपासून काढणी उरकण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आता बºयाच ठिकाणी ज्वारीची काढणी होऊन शेतात कडब्याच्या पेंढ्या पडल्या आहेत. अशात पाऊस झाल्यास पिकाची प्रत खराब होणार आहे. त्यामुळे हाती आलेले पीक मातीमोल ठरणार आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी लगबग सुरू केली आहे.
गहू, हरभ-याचे पीक काढणीवर आहे. गव्हाची कापणी सुरू झाली आहे. पाऊस आल्यास पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी लगबग सुरू केली आहे. त्यामुळे मळणीसाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. पंजाबहून आलेल्या हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू, हरभरा आणि करडईची काढणी वेगाने सुरू झाली आहे. फक्त ज्वारी काढणी व मोडणीला यंत्राचा अडसर ठरत आहे.
या कामासाठी मनुष्यबळ लागत असल्याने मजुरांचे दर वाढले आहेत. उपलब्ध मजुरांवर कामे उरकण्यावर भर देण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. यंदा ज्वारी, गहू व हरभ-याला उतारा चांगला मिळत असल्याने शेतकरी आनंदात दिसत आहेत.
ज्वारीचा दर उतरणार...
गेल्या वर्षभरात तूर डाळीने चांगलाच भाव खाल्ला. म्हणून शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड केली. त्यामुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. बाजारात तुरीची आवक झाल्याने भाव गडगडले आहेत. डाळीचा भाव आता बराच खाली आला आहे. सध्या मालदांडी ज्वारी व इतर वाणांना चांगला भाव आहे. मंगळवेढा, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यात यंदा ज्वारीचे पीक चांगले आहे. उतारा चांगला मिळत असल्याने भाव खाली येण्याची शक्यता शेतकºयांनी वर्तवली आहे.