आॅनलाईन लोकमत सोलापूरसचिन कांबळे - पंढरपूरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व राज्यभरात मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्यात आली. त्याचबरोबर बाबासाहेब शिक्षणासाठी राहत असलेल्या लंडन येथील घराचा प्रश्न मार्गी लागला. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दादर येथील इंदूमिलच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला. परंतु पंढरपूर येथील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनासाठी मागील तीन वर्षांपासून फक्त तारीखच जाहीर होते; मात्र उद्घाटन काही होत नाही. यामुळे यंदाच्या वर्षी तरी हा कार्यक्रम होणार का? याकडे सर्व भीम अनुयायांचे लक्ष लागले आहे.सोलापूरचे आर्किटेक्ट यादगीर कोंडा यांच्याकडून ६० बाय ७० एवढ्या जागेत आराखडा तयार करून घेण्यात आला होता. स्मारकाच्या कामास १२ फेब्रुवारी २०१३ रोजी सुरुवात केली. या स्मारकासाठी ५१ लाख ५० हजार ८२० रुपये खर्च येणार होता. स्मारकाच्या कामासाठी माजी नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव व माजी नगरसेवक सुनील सर्वगोड यांनी सतत पाठपुरावा केला. स्मारकाचे काम पूर्ण होऊन देखील, अनेक मंत्री महोदयांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी पुतळा बसविण्यास विलंब करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी फक्त पुतळ्याचे या दिवशी उद्घाटन होणार असल्याचे पुढाऱ्यांकडून सांगण्यात येते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या तारखेचे गणित जुळत नसल्याने फक्त पुतळा अनावरणाच्या तारखाच जाहीर करुन भीम अनुयायांच्या भावना दुखावण्याचे काम नेतेमंडळींकडून होत आहे. त्याच नेतेमंडळींनी मागील तीन महिन्यांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा फेब्रुवारीमध्ये बसविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु पुन्हा गत वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पुन्हा पुतळा बसविण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. -----------------------मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्नस्मारकाचे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले आहेत. पंढरपूर येथे बसविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नगरपालिकेकडून निमंत्रण पत्रिका पाठवली असून लवकरच सर्व बाबी पूर्ण होतील, असे नगराध्यक्षा साधना भोसले यांनी सांगितले.
पंढरपूरातील आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनासाठी तारीख पे तारीख
By admin | Updated: March 31, 2017 14:33 IST