सोलापूर - पुणे रेल्वे मार्गावरील पुण्याहून सोलापूरकडे जाणारी मालवाहतूक रेल्वे गाडी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वेगाने करमाळा तालुक्यातील जिंती रोड रेल्वे स्टेशन पार करून पुढे पारेवाडीकडे जात असताना गुलमोहरवाडी रेल्वे गेटही पास केल्यानंतर या गाडीचे कपलिंग अचानकपणे तुटून (ट्रेन पार्किंग) या रेल्वे गाडीचे दोन भाग झाले. एअर ब्रेकमुळे एक भाग पुढे जाऊन थांबला होता तर दुसरा भागही हिंगणी पुलाच्या पलीकडे थांबला होता. अशाप्रकारे गाडीचे दोन भाग झाले व एकेरी रेल्वे मार्गावर दोन्ही भाग काही अंतरावर थांबल्याने ही बाब गुलमोहरवाडी येथील शेतकरी राजू गावडे व हिंगणीचे शेतकरी भाऊसाहेब जाधव यांच्या लक्षात आली.
त्यांनी तत्काळ सतर्कता बाळगून गुलमोहरवाडी गेटमन यांना ही माहिती दिली व त्या गेटमेनने पारेवाडी रेल्वे स्टेशन मास्तरांना कळविल्यानंतर दीड तासाने या गाडीचे चालक व गार्ड यांनी तुटलेले कपलिंग जोडून ही मालवाहू रेल्वेगाडी पुढे सोलापूरकडे मार्गस्थ केली. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढे होणारी दुर्घटना टळली.
या मार्गावर अशा प्रकारचा ट्रेन पार्किंग हा प्रकार पहिल्यांदाच घडला.
या दरम्यान सोलापूरहून पुण्याकडे जाणारी कोईम्बतूर - कुर्ला एक्सप्रेस गाडी नं. ०१०१४ ही सोलापूरहून मुंबईकडे जाणारी गाडी त्यानंतर पुढे व्यवस्थितपणे मार्गस्थ झाली. घडलेल्या या प्रकारामुळे सुमारे ४० मिनिटे ही गाडी पारेवाडी स्थानकावर थांबविण्यात आली होती. हा प्रकार ३१२ किलोमीटरजवळ घडला. हा प्रकार कशामुळे घडला हे मात्र समजू शकले नाही. वेगाने जाणाऱ्या गाडीचे ट्रेन पार्किंग झालेच कसे? रेल्वे गाड्यांची व्यवस्थित तपासणी केली जात नाही का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
फोटो: तालुक्यातील गुलमोहोरवाडी रेल्वे गेटजवळ मालगाडीचे कपलिंग तुटले.
-----