ग्रामीण भागात अनेक वर्षांची जुनी आमराई आढळते. प्रामुख्याने ओढे, बांध अशा ठिकाणी भलीमोठी आंब्याची झाडे वर्षानुवर्षे उत्पन्न देत आहेत. यामध्ये अनेक झाडांचे आंबे वेगवेगळ्या आकाराचे व चवीचे असतात. गावठी आंबे बाजारात इतर आंब्यांच्या तुलनेत उशिरा दाखल होतात. यावर्षी कोरोना महामारीमुळे या आंब्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे साहाजिकच आंब्याचे भाव यावर्षी ढासळलेल्या स्थितीत आहेत. यातच पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे पुन्हा दराची घसरण सुरू झाली आहे.
गावठी आंबे औषधी
ग्रामीण भागात आजही शेकडो वर्षांपूर्वीचे गावठी आंबे पाहायला मिळतात. यात आंबट-गोड अशा वेगवेगळ्या चवीची गावठी झाडे असतात. यासाठी रासायनिक खताची मात्रा दिली जात नसल्याने हे आंबे पूर्णपणे सेंद्रिय अथवा नैसर्गिक पद्धतीने पिकविले जातात. याशिवाय या आंब्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे गावठी झाडे हमखास दिसतात. यातील वेगवेगळ्या गुणधर्मामुळे या आंब्यांकडे औषधी आंबा म्हणून पाहिले जाते.