काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या कार्यकर्त्यांत पुन्हा संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:39+5:302021-07-08T04:15:39+5:30

कुडल येथील शिवानंद पाटील यांची सिद्धेश्वर बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता समोर आली. कोणत्याच ...

Confusion again among the workers on the path of Congress | काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या कार्यकर्त्यांत पुन्हा संभ्रम

काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या कार्यकर्त्यांत पुन्हा संभ्रम

Next

कुडल येथील शिवानंद पाटील यांची सिद्धेश्वर बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता समोर आली. कोणत्याच राजकीय पक्षात आपल्याला मानाचे पान नाही. आता असे किती दिवस थांबायचे, हा विचार मांडत बहुतेकांनी काँग्रेस पक्षात काम करण्याचा विचार बोलून दाखवला. या कार्यकर्त्यांमध्ये माजी आमदार दिलीपराव माने आणि स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांना मानणाऱ्यांची संख्या अधिक होती. नेताच नसलेल्या कार्यकर्त्यांची अवस्था डोक्यावरचे छत्र हरपले यासारखी झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. सर्वसमावेशक आणि पूर्वीपासून नाळ जोडली असल्याने काँग्रेस पक्षात जाणे सोयीचे ठरेल यावर एकमत झाले.

गेल्या दोन दिवसात कार्यकर्त्यांच्या संभ्रमावस्थेमुळे नेत्यांमध्येही अस्वस्थता पसरली आपापल्या कार्यकर्त्यांना सबुरीचे सल्ले देण्यात आले. त्यामुळे दोनच दिवसापूर्वी घेतलेल्या निर्णयानंतर पुन्हा कार्यकर्त्यात संभ्रमच पसरला. काँग्रेसमध्ये आपला नेता कोण, या विचाराने त्यांच्यात मतभेद सुरू झाले. आगामी राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असा सूर उमटला तर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पुढची दिशा ठरवावी असे अनेकांना वाटते त्यामुळे एकत्रित काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात असलेल्यानी तूर्तास पक्षनिवडीचा बेत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. यात गंगाधर बिराजदार (निम्बर्गी), श्रीशैल पाटील (तेलगाव) या माने समर्थकांचा समावेश आहे .

--------

शिवदारे समर्थक तटस्थ राहणार

राजशेखर शिवदारे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी भाजपशी असलेले संबंध तोडले. आता ते कोणत्याच पक्षात नाहीत. त्यांचा निर्णय होईपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका शिवानंद पाटील यांच्यासह शिवदारे समर्थकांनी घेतली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याच पक्षात जाण्याऐवजी दबावगट स्थापन करावा असाही सूर पुढे येत आहे.

-------

काँग्रेसने दखलही घेतली नाही

अस्वस्थ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असला तरी पक्षातील एकाही नेत्याने त्यांच्याशी संपर्क केला नाही. सध्या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काँग्रेसमध्ये अनेक स्वतंत्र गट कार्यरत आहेत. कार्यकर्त्यांनी स्वतः नेत्यांशी संपर्क साधला असता आम्हालाच पक्षात वाली नाही, तुम्हाला इथं कोण विचारणार? असा प्रतिप्रश्न विचारत बेदखल केल्याची संतप्त भावना व्यक्त केली.

----

Web Title: Confusion again among the workers on the path of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.