बदलते वातावरण रब्बी पिकांना पोषक
मंगळवेढा : सध्या थंडी वाढत असून हे बदलते वातावरण रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा या पिकांना पोषक ठरत आहे. रब्बीची पेरणी झाल्यानंतर एकही पाऊस झाला नाही. केवळ ओलीवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर आता केवळ थंड हवेवरच वरील पिके जोमाने वाढताना दिसत आहेत.
उजनीतून पाणी सोडण्याची मागणी
मंगळवेढा : उजनी धरण १०० टक्के भरल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात भीमा नदीतून बरेच पाणी वाहून गेले. सध्या काही ठिकाणी पात्र कोरडे पडले आहे. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांमधून उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. कारण सध्या ऊस कारखान्याला गेल्याने त्या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे.
शाळा सुरू पण विद्यार्थी संख्या कमीच
मोहोळ : तालुक्यातील अनेक ठिकाणी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा सुरूच झाल्या नाहीत. उशिराने सुरू झाल्याने अजूनही पालक, विद्यार्थ्यांमधून कोरोना संसर्गाबाबत भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जायला तयार होईनात, परिणामी विद्यार्थी संख्या कमी झाली आहे.