अक्कलकोट : शेताची वाटणी न झाल्याने पाईपलाईन करायला विरोध केल्याने दोघा भावांनी सख्ख्या भावाच्या डोक्यात लाकडाने मारून प्राणघात हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बिरप्पा भीमशा घोडके (रा. हन्नूर, ता. अक्कलकोट) या यांनी दोघा भावांविरोधात फिर्याद दिली आहे. २२ मे रोजी रात्री १० वाजता चुंगी शिवारातील शेतात हा प्रकार घडला. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात म्हाळप्पा घोडके, तिपण्णा घोडके (दोघेही रा. चुंगी, ता. अक्कलकोट) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रांकडील माहितीनुसार म्हाळप्पा आणि तिपण्णा हे दाेघे शेतात जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईनसाठी खड्डा खोदत होते. दरम्यान, बिरप्पा हे तेथे आले आणि शेताची वाटणी व्हायची आहे. यामुळे पाईपलाईन करू नका. वाटणी झाल्यावर करून घ्या, असा सल्ला दिला. इतक्यात चिडून जाऊन म्हाळप्पा याने लाकडाने फिर्यादीच्या डोक्यात मारले. तो रक्तबंबाळ होऊन खाली काेसळला. त्यानंतर तिपण्णा याने अंगावर धावून जाऊन दमदाटी केली. या अवस्थेत बिरप्पाने स्वत:ची सुटका करुन घेत त्याने हन्नूर गाव गाठले. रात्री प्राथमिक उपचार घेऊन दुसऱ्या दिवशी उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.