- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर - नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक म्हणून बुधवारी पदभार स्वीकारला आहे. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेतील १९८५ बॅचचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते.
यापूर्वी अशोक कुमार मिश्र यांच्याकडे मध्य रेल्वेचा अतिरिक्त पदभार होता. लालवानी यांनी १९८५ मध्ये श्री गोविंदराम सक्सेरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (इंदौर) येथून पदवी मिळवली आहे. २०१० मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(इंदौर)येथून व्यवसाय प्रशासनात कार्यकारी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. लालवानी यांना निर्माण आणि ओपन लाइन ऑपरेशन या दोन्हींचा व्यापक अनुभव आहे. भारतीय रेल्वेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा त्यांना समृद्ध अनुभव आहे. आसाममधील लुमडिंग येथून कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी १० वर्षे ईशान्य फ्रंटियर रेल्वेमध्ये काम केले. यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वेत अहमदाबाद आणि मुंबई विभागात विविध पदांवर काम केले.