कासेगाव (ता. पंढरपूर) येथे रविवारी जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या उपस्थितीत येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कल्याणराव काळे यांनी स्व:पक्षातील नेत्यांवरच विविध आरोप करून राळ उडवून दिली. त्यावर आज ॲड. दीपक पवार, ॲड. गणेश पाटील, युवराज पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दोन्ही कारखान्यांचे चेअरमन स्वत:ला नेते म्हणवून घेत आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून विठ्ठल, चंद्रभागा, भीमा या तिन्ही कारखान्यांची मिळून ऊसबिले, कामगारांचे पगार व इतर देणे असे मिळून तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणी थकविलेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना कसल्या बैठका घेता? असा सवाल उपस्थित केला. या बैठकीमध्ये येणाऱ्या झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका याबाबत सविस्तर चर्चा होणे गरजेचे असताना त्यांनी आमच्यावरच जास्त चर्चा केल्याचे दीपक पवार म्हणाले. पक्षाच्या बैठकांना कारखान्याच्या चिटबॉयमार्फत निरोप दिले जातात, हा प्रकार चुकीचा आहे. काळे पक्षात आल्यामुळेच पक्षाला घरघर लागली असून मागील पाच वर्षांच्या काळात असा विसंवाद कधीही जाणवला नाही.
........
राष्ट्रवादीच्या प्रतिकूल परिस्थितीत पंढरपूर तालुक्यात एकमेव झेडपी सदस्य पक्षाच्या चिन्हावर निवडून आणण्याचे काम आम्ही केले. मी युवकचा जिल्हाध्यक्ष असताना मला फक्त निरोप दिला जातो. पत्रिकेत इतरांचीच नावे टाकली जातात. हा प्रकार चुकीचा आहे. पक्षाची निवडणूकसंदर्भात बैठक असताना पक्षाच्या एकमेव झेडपी सदस्य व पदाधिकाऱ्यांनाही बोलावले जात नाही. ही बैठक पक्षाची होती की इतर कशाची. याबाबत आम्ही माहिती घेऊ.
- ॲड. गणेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक
..............
आमचे विरोधक कोण आहेत हे आम्हाला माहिती आहे. मेळाव्याबाबत आम्हाला कसल्याही प्रकारे विश्वासात न घेता मेळावा आयोजित केला. पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत झेडपी, पंचायत समिती निवडणूक लढवून पक्षाचे विचार तालुक्यात जिवंत ठेवले. मात्र, आज बाहेरून आलेले काहीजण आम्हाला पक्षनिष्ठा शिकवत आहेत. पोटनिवडणुकीत विरोधात कोणी काम केले याबाबत नावे जाहीर करावीत. स्वत:चे अपयश झाकत आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.
- युवराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस