ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 19 - मनपा निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभागावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर १९३ जणांनी हरकती नोंदविल्या आहेत.
शहरात नव्या नोंदीनुसार २९ हजार ८८५ मतदार वाढले असून, मतदारसंख्या ६ लाख ७३ हजार ९४२ इतकी झाली आहे. २१ फेब्रुवारी रोजी होणाºया महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार याद्या नव्याने करण्यात येत आहेत. यापूर्वी विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीची प्रभागनिहाय प्रारूप यादी पुरवणीद्वारे १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप पुरवणी मतदार यादीवर १७ जानेवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या. यात १९३ जणांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यात प्रभाग बदलल्याच्या तक्रारी खूप आहेत.
तीन हरकती वगळता इतर हरकतींचे निराकरण करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले. २१ जानेवारी रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवरून ३५० इमारतीत ९९० मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. दिव्यांगांसाठी रॅम्प, मतदान केंद्रासमोर रांगोळी, मतदारांचे फुलांनी स्वागत, पाणी, कारपेट अशा सुविधा असलेली आदर्श मतदान केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी सर्व मनपाच्या निवडणूक अधिका-यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन तयारीबाबत माहिती घेतली. त्यात मनपाकडे अद्याप निवडणूक अधिकारी म्हणून रुजू न झालेल्या ज्योत्स्ना हिरमुखे व वैशाली चव्हाण (पुणे) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
चारित्र्य पडताळणीची नाही गरज
उमेदवारांना पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत स्वत: माहिती भरून द्यायची आहे. ज्या उमेदवारांना घरात स्वत: आॅनलाईन फॉर्म भरता येणे शक्य नाही, अशांनी शहरातील ११० इंटरनेट कॅफेचा आधार घ्यावा. या सर्व कॅफेधारकांची आज बैठक घेऊन त्यांना निवडणूक आयोगाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. कमी शुल्कात हे काम होईल. विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयातसुद्धा याची सोय करता येईल. त्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींची २३ जानेवारी रोजी बैठक घेण्यात येणार आहे.