उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे जिल्हा परिषद शाळेसमोर १४ व्यावसायिक गाळे उभारल्याने मुलांना शाळेत जाता येत नाही. ही बाब लक्षात आल्याने मुख्याध्यापकांनी तसे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र याची दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर कुठे प्रशासनाने चौकशीचा फार्स सुरू केला.
विस्तार अधिकारी गोदावरी राठोड यांनी तपासणी करुन गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील व शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांना मंगळवारी हा अहवाल दिला. त्यात शाळेसमोर शाॅपिंग सेंटर उभारल्याने शाळेत जाता येत नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय ही जागा नक्की कुणाची हे तपासावे लागेल, हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
----अहवालात कुणाचीही नावे नाहीत
गटविकास अधिकारी जास्मीन शेख यांच्याकडे शाळेच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी दुसरे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. तिऱ्हे ग्रामपंचायतीला ग्रामसेवकच नसल्याची बाब 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणल्यानंतर बुधवारी संतोष वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश दिला. विस्तार अधिकारी गोदावरी राठोड यांच्या अहवालात केंद्रप्रमुख नागनाथ स्वामी यांचे नाव आहे. मात्र पदाधिकारी, गावकरी व ग्रामस्थ असा उल्लेख आहे. कोणाचीही नावे नाहीत. विशेष म्हणजे मुख्याध्यापकानेही खुलाशातही स्वतःचे नाव लिहिले नाही.
----