उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या काठी मद्यपान करणाऱ्या एका पर्यटकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. एक महिला आपल्या पतीसह नदीच्या काठावर बसून उघडपणे मद्यपान करत असताना स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना हटकले. मात्र, त्यानंतर माफी मागण्याऐवजी संबंधित महिलेने स्थानिक लोक आणि पोलिसांशी हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एक जोडपे ऋषिकेशमधील गंगा नदीच्या काठावर उघडपणे दारू पीत होते. गंगा नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि घाटांच्या परिसरात मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. हे पाहून स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला. मात्र, तरीही त्यांनी मद्यपान सुरूच ठेवले. त्यानंतर लोकांनी पोलिसांना बोलावून घेतले. मात्र, त्यानंतर महिलेच्या तळ पायाची आग मस्तकात गेली आणि तिने स्थानिक लोक आणि पोलिसांशी वाद घातला.
स्थानिक लोक आणि पोलिसांशी वाद
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला बोलत आहे की, "आम्ही पर्यटक आहोत म्हणून तुमच्या घरात चूल पेटते. आम्ही तुमच्या पैशांची पित आहोत का? आम्ही आमच्या पैशांनी पितोय. पर्यटकांमुळेच या शहरात पैसा येतो, हे विसरू नका." या महिलेचा हा उद्धटपणा पाहून स्थानिक लोकही भडकले. "तुमच्या पर्यटनाचा अर्थ धार्मिक स्थळांचा अपमान करणे असा होत नाही", अशा शब्दांत त्यांनी महिलेला प्रत्युत्तर दिले.
संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी
महिलेचा अवतार आणि वाढता वाद पाहून पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याबद्दल आणि धार्मिक स्थळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Web Summary : A tourist couple drinking openly on Rishikesh's Ganga riverbank faced local opposition. The woman argued tourists sustain the local economy, sparking further outrage. Locals demanded action for disrespecting the holy site.
Web Summary : ऋषिकेश में गंगा किनारे शराब पी रहे पर्यटकों का विरोध हुआ। महिला ने कहा कि पर्यटकों से अर्थव्यवस्था चलती है, जिससे और गुस्सा आया। धार्मिक स्थल का अपमान करने पर कार्रवाई की मांग उठी।