इंटरनेटवर सध्या एक अजब आणि हैराण करणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका आयटी कंपनीतील जॉब मुलाखतीत उमेदवाराला उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनला जाडा आणि कुरूप म्हणण्यास सांगितले. त्यानंतर जे घडले त्याने सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसते की, मुलाखत घेणारा उमेदवाराची खरी ओळख पटवण्यासाठी एक अजब टेस्ट घेतो. अनेक स्पर्धक उत्तर कोरियाचे गुप्तहेर बनून अमेरिकन कंपन्यात घुसखोरी करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमेदवारांसमोर ही अट ठेवल्याचं कंपनीकडून सांगण्यात येते. आमच्याकडे अनेक बनावट उमेदवार येतात. विशेषत: उत्तर कोरियाचे असतात. त्यासाठी आम्ही ही चाचणी घेतो. या मुलाखतीत उमेदवाराला सांगितले जाते, की तुम्ही आमच्यासोबत हे म्हणा, किम जोंग उन जाडा आणि कुरूप आहे.
मुलाखत घेणारा हे बोलण्यास सांगतो तेव्हा उमेदवाराच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. तो थरथर कापतो त्यानंतर अचानक व्हिडिओतील स्क्रीन फ्रीज होते. तुला खरेच हे बोलायचं नाही का असं मुलाखतकार उमेदवाराला विचारताना व्हिडिओत ऐकायला येते. एका ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्याला ४१ लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे. नेटिझन्सने या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. उत्तर कोरियाचे कर्मचारी रिमोट जॉबच्या माध्यमातून डेटा चोरी करतात असं काही युजर्सचे म्हणणे आहे. त्यासाठी हा फिल्टर गरजेचा असल्याचं ते सांगतात.
दरम्यान, काही युजर्सच्या मते हा व्हिडिओ जाणुनबुजून पॉज करण्यात आला आहे. जेणेकरून हा उमेदवार फ्रीज झाल्याचं दाखवण्यात यावे. तर काहींनी अमेरिकन उमेदवारांना नोकरी देण्यापूर्वी ट्रम्प यांना शिवी देण्यास सांगतात का असा टोला कंपनीला लगावत आहेत.