भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा कधीही कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना दिसणार नाही. रोहित शर्माने बुधवारी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून निवृत्तीची माहिती दिली. रोहित शर्माने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माची कट्टर चाहती असलेल्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करताच तिला अश्रू अनावर झाले.
रोहित शर्माच्या या चाहतीचे नाव जिनिया देबनाथ असल्याचे सांगण्यात आले. 'व्हिडिओमध्ये ती बोलत आहे की, आई, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मला खूप वाईट वाटत आहे. माझे स्वप्न अधुरे राहीले. मला त्याला कसोटी क्रिकेट खेळताना पाहायचे आहे. पण आता हे शक्य नाही.' यानंतर तरुणीच्या आईने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळत राहील, असे तिला म्हटले. पुढे तरुणी बोलते की, 'आई तुला कळणार नाही. मला वाटले होते की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकेल. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा पहिला कर्णधार ठरेल.'
रोहित शर्माची कसोटी कारकिर्दरोहित शर्माने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर, बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील मेलबर्न कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरला. रोहित शर्माने १२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ६७ सामने खेळले आहेत. यात त्याने ४ हजार ३०१ धावा केल्या आहेत. रोहित शर्माचा कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २१२ धावा होती. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर १२ शतके आणि १८ अर्धशतके आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची कामगिरीरोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीत फक्त एकच द्विशतक आहे, जे २०१९ मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकले. रोहित शर्माने त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात १७७ धावांच्या शानदार खेळीने केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण ४७३ चौकार आणि ८८ षटकार मारले. २०२१ मध्ये रोहित शर्माने कसोटी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २४ पैकी १२ सामने जिंकले आणि ९ सामने गमावले. तर, तीन सामने अनिर्णित ठरले.