धुळे: गेल्या वर्ष दीड वर्षापासून डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना संकटाचा सामना करत आहे. या कालावधीत शेकडो डॉक्टरांनी रुग्णसेवा करताना प्राण गमावला. मात्र तरीही ते त्यांच्या कर्तव्यापासून जराही विचलित झालेले नाहीत. रुग्णसेवेत स्वत:ला झोकून देणाऱ्या, तासनतास कर्तव्य बजावणाऱ्या अनेक डॉक्टरांच्या कहाण्या आपण गेल्या काही महिन्यांपासून ऐकत आहोत. यानंतर आता धुळ्यातील एका डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वेळेआधी जन्मलेल्या मुलांना निओनॅटल इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (NICU) ठेवण्यात येतं. या मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. धुळ्यातील एनआयसीयूमध्ये दाखल असलेलं असंच एक बाळ रात्री अचानक मोठमोठ्यानं रडू लागलं. या बाळाला शांत करण्यासाठी, त्याला झोप यावी म्हणून तिथे असलेल्या डॉ. अभिनय दरवडे यांनी त्याच्यासाठी एक सुंदर गाणं गायलं. 'इस मोड से जाते है.. कुछ सुस्त क़दम रस्ते.. कुछ तेज़ क़दम राहें..' या गाण्याच्या ओळी डॉक्टरांनी बाळाला गाऊन दाखवल्या. विशेष म्हणजे त्यावेळी बाळाचं रडणं पूर्णपणे थांबलं होतं. डॉक्टरसाहेब तानसेन झाले असताना इवलंसं बाळ कानसेन झालं होतं आणि डॉक्टरांचं गाणं अगदी तल्लीन होऊन ऐकत होतं.
व्वा डॉक्टर! चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 12:13 IST