दिल्लीतील एक तरुण त्याच्या वडिलांसोबत फाईव्ह स्टार आयटीसी हॉटेलमध्ये गेला. जेव्हा वडिलांनी हे लग्झरी हॉटेल पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण ते याच आलिशान हॉटेलमध्ये पाच वर्षे वॉचमन म्हणून काम करत होते. वडिलांसोबतचा फोटो शेअर करताना तरुणाने म्हटलं की, २५ वर्षांनंतर मला माझ्या वडिलांना आयटीसीमध्ये घेऊन जाण्याची संधी मिळाली आहे. यावेळी ते हॉटेलमध्ये एक कर्मचारी म्हणून नाही तर पाहुणे म्हणून आले होते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, आर्यन मिश्रा या तरुणाने याबाबत पोस्ट केली आहे. त्याने आयटीसी हॉटेलमध्ये जेवताना त्याच्या पालकांसोबत बसलेला फोटो शेअर केला. आर्यनने लिहिलं की, "माझे वडील १९९५ ते २००० पर्यंत नवी दिल्लीतील आयटीसीमध्ये वॉचमन होते. आज मला त्यांना त्याच ठिकाणी जेवणासाठी घेऊन जाण्याची संधी मिळाली."
आर्यन मिश्राची ही हृदयस्पर्शी गोष्ट वाचून सोशल मीडिया युजर्सना खूप आनंद झाला आहे आणि त्यांनी तरुणाचं भरभरून कौतुक केलं आहे. आजच्या काळातही अशी मुलं आहेत जे आपल्या पालकांना खूश करण्यासाठी असं काहीतरी स्पेशल करतात, असं म्हणत युजर्स आर्यनचं कौतुक करत आहेत.
एका युजरने म्हटलं, "तुम्ही कोण आहात हे मला माहित नाही पण ही सुंदर गोष्ट, घटना पाहून माझं हृदय आनंदाने भरून जातं, तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी मी खूप आनंदी आहे." तसेच दुसऱ्याने "तुमच्या यशाचा आनंद साजरा करण्याचा आणि या क्षणांना जपण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या पालकांची काळजी घ्या" असं म्हटलं. अनेकांनी आर्यन मिश्राला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.