भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधू आपल्या आयुष्यातील एका खास इनिंगला सुरुवात करणार आहे. २२ डिसेंबरला भारतीय शटलर व्यंकट दत्त साई याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. घरात लगीन घाई सुरु असताना पीव्ही सिंधू होणाऱ्या पतीसोबत लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी थेट क्रिकेटच्या देवाच्या घरी पोहचल्याचे पाहायला मिळाले. दोघांनी अगदी जोडीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबियांना लग्नाचे खास निमंत्रण दिले.
मास्टर ब्लास्टर सचिनची PV Sindhu साठी खास पोस्ट
क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडत 'मास्टर ब्लास्टर' नावाने ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं एक्स अकाउंटवरून पीव्ही सिंधू आणि तिचा होणारा पती व्यंकट दत्त साई यांच्यासोबतचा खास फोटो शेअर केला आहे. नव्या इनिंगला सुरुवात करणाऱ्या पीव्ही सिंधूला त्याने खास शब्दांत शुभेच्छा दिल्याचे दिसते. सिंधू अन् तिच्या होणाऱ्या जोडीदाराला लग्नाच्या शुभेच्छा देणारी सचिनची पोस्ट तो शब्दाच्या खेळातही 'मास्टर' असल्याचे दर्शवणारी आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे.
सचिन तेंडुलकरनं पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?
बॅडमिंटनमध्ये स्कोअरची सुरुवात ही नेहमी 'Love' अशी होते. व्यंकट दत्ता साईसोबतचा तुझा प्रवास सुंदर अन् प्रेमानं बहरलेला असेल. तुमच्या आयुष्यातील खास क्षणी उपस्थितीत राहण्यासाठी वैयक्तिकरित्या निमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आयुष्याच्या नव्या प्रवासातील आठवणी अन् आनंद यांची सुरेख रॅली पाहायला मिळो, अशा आशयाची पोस्ट शेअर करत सचिन तेंडुलकरनं बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूला आणि तिच्या जोडीदाराला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'त्या' दोन शब्दांमुळे सचिनच्या पोस्ट ठरते एकदम खास
पीव्ही सिंधूसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं जी पोस्ट शेअर केली आहे त्याची सुरुवात 'लव्ह' या शब्दांनी होते. याशिवाय या पोस्टच्या शेवटी त्याने 'रॅली' हा शब्द वापरल्याचे दिसून येते. हे दोन्ही शब्द बॅडमिंटन खेळात खास अर्थानं वापरले जातात. खेळाडू किंवा दोन संघ बॅडमिंटनच्या कोर्टवर प्रतिस्पर्धा करण्यासाठी उतरतात त्यावेळी ०-० स्कोअर असतो. त्यावेळी बॅडमिंटनमध्ये Love ALL असा शब्दप्रयोग केला जातो. याशिवाय दोन्ही खेळाडूंमध्ये शटल खाली न पडू देता रंगलेला खेळाला 'रॅली' असं म्हटलं जाते. या दोन शब्दांचा सुरेख वापर करत तेंडुलकरनं फुलराणीला शुभेच्छा दिल्याचे आहेत.