चीनमध्येतुरुंगवासाची शिक्षा टाळण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शांक्सी प्रांतातील एका महिलेला फसवणुकीच्या आरोपाखाली पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मात्र ही शिक्षा टाळण्यासाठी तीने चार वर्षांत तब्बल तीन वेळा प्रेग्नंट राहण्याचा असामान्य प्रकार अवलंबला. मात्र, तिचा हा प्रयत्न आता अयशस्वी झाला आहे आणि तिला अटक केंद्रात पाठवण्यात आले आहे. येथे ती तिची उर्वरित शिक्षा भोगेल. चीनमध्ये, या महिलेला चेन होंग या तिच्या टोपणनावाने ओळखले जाते. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण -चेन हाँगला डिसेंबर २०२० मध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, तुरुंगात राहण्या ऐवजी, तिने चीनच्या कायद्याचा गैरफायदा घेतला. हा कायद गर्भवती महिला आणि नवजात बाळांची काळजी घेणाऱ्या मातांना तुरुंगाबाहेर शिक्षा भोगण्याची परवानगी देतो. या तरतुदीनुसार, दोषींना दर तीन महिन्यांनी गर्भधारणा अथवा आरोग्य अहवाल सादर करावा लागतो. आणि स्थानिक सुधारना संस्थांकडून त्यांची नियमितपणे तपासणी केली जाते.
चेनने २०२० ते २०२४ दरम्यान एकाच पुरूषापासून तीन मुलांना जन्म दिला, अशा पद्धतीने ती वारंवार तुरुंगवासाची शिक्षा टाळत राहिली. प्रत्येक गर्भधारणेवेळी अथवा नवजात बालकाची काळजी घेत असल्याने तिला तुरुंगाबाहेर राहण्याची परवानगी मिळाली. मात्र, मे २०२५ मध्ये नियमित तपासणी दरम्यान, चेन तिच्या नवजात बालकासोबत राहत नसून मुलाची घरगुती नोंदणी (हुको) तिच्या एक्स पतीच्या बहिणीच्या नावावर असल्याचे, अधिकाऱ्यांना आढळून आले. अर्थात, यामुळे संबंधित मूल कायदेशीररित्या दुसऱ्याचे झाले.
तपासात असेही उघड झाले की, चेनने आधीच तिच्या पतीला घटस्फोट दिला आहे. तिची पहिली दोन मुले तिच्या एक्स पतीसोबत राहत होती, तर तिसरे मूल तिने तिच्या एक्स पतीच्या बहिणीला दिले होते. यानंत, स्थानिक वकिलांनी चेनवर तुरुंगवास टाळण्यासाठी गर्भधारणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आणि तिला तुरुंगात पाठवण्याच सल्ला दिला. अखेर, चेनला तिची उर्वरित शिक्षा (सुमारे एक वर्ष) पूर्ण करण्यासाठी एका तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनी चिनी कायद्यातील अशा त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.