मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या शेजारी बसून एका तरुणाने हस्तमैथुन केल्याचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या हार्बर लाईनवरील लोकल ट्रेनमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. या घटनेने मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित महिलेच्या समोर बसलेल्या एका प्रवाशाने तिला जागा बदलण्यास सांगितले. महिलेने कारण विचारले असता, त्याने सांगितले की, तिच्या शेजारी बसलेला तरूण तिच्याकडे पाहून हस्तमैथुन करत आहे. हे समजताच महिला संतापली आणि तिने संबंधित तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार समजताच ट्रेनच्या गेटजवळ उभा असलेला एक प्रवाशानेही त्या तरुणाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर महिला आणि संतप्त जमावापासून स्वत:ला वाचवण्यासाठी तरूण धावत्या ट्रेनमधून उडी मारतो आणि प्लॅटफॉर्मवर पडतो आणि व्हिडीओ तिथेच संपतो.
इंस्टाग्रामवर 'अबरार शेख' (@abrar12shaikh) या युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, 'सार्वजनिक ठिकाणी असे घाणेरडे कृत्य करणे केवळ गुन्हाच नाही, तर समाजासाठी लज्जास्पद गोष्ट आहे, अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा झाली नाही, तर महिलांची सुरक्षा नेहमीच धोक्यात राहील, असेही त्याने नमूद केले. हा व्हिडिओ नंतर इंस्टाग्रामवरून हटवण्यात आला आहे.