आरा - बिहारच्या आरा जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका आईची मुलाला वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड दिसून येते. या हृदयद्रावक व्हिडिओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. एका अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. ही बातमी आईला समजताच ती धावत धावत हॉस्पिटलला पोहचली, जिथे तिचा मुलगा मृतावस्थेत पडला होता. परंतु मुलाचा मृत्यू झाला आहे हे मानण्यास ती तयार नव्हती. ती स्वत: मुलाला ऑक्सिजन देत राहिली, कधी सीपीआर देऊन मुलाला जिवंत करण्याचा केविळवाणा प्रयत्न करत राहिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मृत मुलाची आई होमगार्डमध्ये कार्यरत आहे.
माहितीनुसार, आराच्या गोढना रोड येथे राहणारी सूमन देवी आणि तिचे पती संतोष शर्मा यांचा मुलगा मोहित राजने घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. आसपासच्या लोकांनी त्याला सदर हॉस्पिटलला नेले, तिथे डॉक्टरांनी तपासून संतोषला मृत घोषित केले. जेव्हा ही घटना कामावर असलेल्या आईला समजली तेव्हा ती त्याच अवस्थेत रुग्णालयात पोहचली. तिने मुलाला पाहून त्याला सीपीआर देऊन, ऑक्सिजन देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाचा मृत्यू झाल्याने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. परंतु या घटनेने एका आईची माया पाहून तिथे उपस्थित असणाऱ्यांचं काळीज पिळवटून निघाले. काहींनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
आराच्या डीएम ऑफिसमध्ये कार्यरत सूमन देवी जेव्हा हॉस्पिटलला पोहचली तेव्हा तिची नजर स्क्ट्रेचरवर पडलेल्या मुलाकडे गेली. मुलगा मृत अवस्थेत असला तरी आईचं मन ते वास्तव स्वीकारायला तयार नव्हते. मुलाला मृत्यूच्या दाढेतून पुन्हा खेचून आणू असं तिला वाटत होते. त्यामुळे ती मुलाच्या तोंडातून त्याला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करू लागली. इतकेच नाही तर सीपीआर देण्याचाही तिने प्रयत्न केला. जवळपास १ तास तिची ही धडपड मुलाला वाचवण्यासाठी सुरू होती. त्यानंतर मुलाच्या मृतदेहाशेजारी ती बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळली.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओने लोकांचे डोळे पाणावले आहेत. प्रत्येक जण या आईवर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरामुळे व्यतीत झालेला दिसून येतो. हॉस्पिटलमधील काही लोकांनी या आईची धडपड पाहिली, ती मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच पाहता पाहता तो प्रचंड व्हायरल झाला.