गुजरातच्या सूरतमधील डुमस बीचवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुणांना त्यांची मस्ती नडली आणि ती त्यांच्याच अंगलट आली. स्टंट करताना एक मर्सिडीज कार बीचच्या दलदलीत अडकली. रविवारी ही घटना घडली आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लोक कारभोवती उभे असल्याचं दिसत आहे आणि कार दलदलीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
काही तरुणांनी त्यांची मर्सिडीज कार डुमस बीचवर पाण्यात नेली, जिथे वाहनांना पूर्णपणे बंदी आहे. ते स्टंट करण्याच्या उद्देशाने समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले होते. पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावर दलदल झाली होती आणि स्टंट करताना त्यांची कार या दलदलीत अडकली.
व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसतं की कार दलदलीत खूप अडकली आहे आणि काही लोक कारभोवती उभे राहून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. कार बाहेर काढू न शकल्याने अडचणीत सापडलेले दिसत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. डुमस बीचवर अशा प्रकारच्या स्टंटचे व्हिडीओ यापूर्वीही अनेकदा समोर आले आहेत. या घटनेनंतर सूरत पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे आणि त्याची चौकशी देखील सुरू केली आहे.