मुंबई लोकमधून प्रवास करताना एका महिलेने आणि तिच्या पतीने दिव्यांग व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून बदलपूरच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमधील दिव्यांग डब्यात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संबंधित महिला आणि तिच्या पतिविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी अनेकांनी मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पाटील असे पीडित व्यक्तीचे नाव असून ते दिव्यांग आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उमेश खिडकीजवळ उभा असल्याचे दिसून आले. तर, एक महिला त्यांच्या अंगावर धाऊन जाते आणि त्यांना मारहाण तसेच शिवीगाळ करते. नंतर या महिलेचा पती हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा करतो. परंतु, ही महिला कोणाचेही ऐकून न घेता दिव्यांग व्यक्तीला मारहाण करते.
पाटील यांनी फ्री प्रेस जर्नल दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दिव्यांग डब्याच्या दाराशी बसली होती. लोकल डोंबिवलीजवळ पोहोचताच पाटील यांनी महिलेला उठायला सांगितले. मात्र, त्यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने पाटील आणि आक्षेप घेणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाशी वाद घालायला सुरुवात केली. महिलेने ती गर्भवती असून तिला पटकन उतरता यावे म्हणून दारात बसल्याचे कारण दिले. त्यावेळी पाटील यांनी महिलेला शिवीगाळ करू नको, असे सांगताच ती भडकली आणि तिने पाटील यांना मारहाण केली. एवढेच नाही तर महिलेने लोकलची आपत्कालीन साखळी देखील ओढली. अखेर महिलेच्या पतीने मध्यस्ती करून तिला बाजूला केले.
पाटील पुढे म्हणाले की, "मी अंबरनाथचा रहिवासी आहे. नोकरीमुळे मला सहजासहजी सुट्टी घेता येत नाही. मला पोलिस ठाण्यात फिरणे परवडत नाही. मी कधीही महिलांशी गैरवर्तन केले नाही आणि तरीही माझी कोणतीही चूक नसताना मला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यात आली." डोंबिवली सरकारी रेल्वे पोलिसांनी पाटील यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्यास सांगितले. पंरतु, डोंबिवली किंवा सीएसएमटी जीआरपी दोघांनाही पाटील यांच्याकडून औपचारिक तक्रार मिळालेली नाही.