सोशल मीडिया आता प्रत्येक गल्ली, शहर आणि गावागावात पोहोचला आहे. त्यामुळे अनेक लोकांमध्ये असलेले सुप्त गुण बाहेर येत असून त्यांना मोठं व्यासपीठ मिळत आहे. यशोदा लोधी हे उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील उत्तम उदाहरण आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ती गरिबीतून बाहेर आली आहे आणि आता सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त पैसे कमवत आहे.
यशोदा लोधी आज 'देहाती मॅडम' म्हणून ओळखली जाते. ती इंग्रजीची शिक्षिका असून उत्तर प्रदेशातील कौशांबी भागात तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे अनेकांना शिकवते. यशोदा लोधीला पाहिल्यावर ती किती साधी आहे याचा अंदाज येतो. पण ती बोलायला लागली की सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तिच्या YouTube चॅनेलवर, साधे व्हिडीओ शेअर करते आणि लोकांना इंग्रजी शिकवते. यशोदाने अनेकांना आपल्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवलं आहे.
यशोदा सर्वसामान्य घरात वाढली. ती तिच्या मामाच्या घरी लहानाची मोठी झाली, जिथे तिने 12वी पर्यंत हिंदीमध्ये शाळेत शिक्षण घेतले. यशोदा नंतर मुलांना शिकवू लागली. याच काळात ती तिच्या आयुष्याच्या जोडीदाराला भेटली, तिच्या नात्याला तिच्या कुटुंबाने पाठिंबा दिला नाही. यशोदाला तिच्या मामाने आणि आई-वडिलांनी घरातून हाकलून दिलं. मुलाच्या घरच्यांनीही हे लग्न मान्य केलं नाही. अशा प्रकारे यशोदा आणि तिचा पती वेगळे राहू लागले.
यशोदाचा पती आठवी पास होता, त्यामुळे तो रोजंदारी मजूर म्हणून काम करायचा. लग्नाच्या दोन वर्षानंतर 2019 मध्ये त्याचा अपघात झाला आणि त्याचा पाय ट्रॅक्टरखाली अडकला. तो आता कामावर जाऊ शकत नव्हता. अशाप्रकारे यशोदाने नोव्हेंबर 2021 मध्ये पहिला स्मार्टफोन विकत घेतला आणि प्रेरणादायी व्हिडीओ पाहून त्यावर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांच्या व्हिडीओद्वारे महिला घरबसल्या काम करून पैसे कसे कमावू शकतात यावरून तिला प्रेरणा मिळाली.
यशोदाने तिचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आणि इतरांना इंग्रजी कसे शिकायचे आणि कसे बोलावे याचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अशा रीतीने अथक परिश्रमानंतर यशोदा ही देहाती मॅडम म्हणून ओळखली जाऊ लागली. एकेकाळी यशोदेला केवळ 300 रुपये घेऊन जगावे लागत होते. आता यशोदाचे YouTube वर 2.31 लाख सबस्क्रायबर आहेत आणि ती एका महिन्यात 80,000 ते 1 लाख रुपये कमावते जी खरोखरच खूप मोठी रक्कम आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.