भारतात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो. गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटची क्रेझ पाहायला मिळते. भारताचा स्टार जलदगती गोलंदाज उमरान मलिक आणि IPL मधील स्टार अब्दुल समदसारख्या काश्मीर खोऱ्यातील पोरांनी या भागातील क्रिकेटची क्रेझ आणखी वाढवलीये. त्याचीच एक झलक सध्या सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावानंतर पारा इतका घसरलाय की, इथल्या तलावाचे बर्फाच्या पठारात रुपांतर झाल्याचं दिसून येतेय. या परिस्थितीत काही मुलांनी थेट तलावाच्या डबक्यात गोठलेल्या बर्फात क्रिकेटचा खेळ मांडल्याचे पाहायला मिळाले.
गोठलेल्या तलावाच्या पाण्याचं झालं बर्फाच पठार; त्यावर रंगला क्रिकेटचा डाव
ANI च्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गोठलेल्या तलावाच्या पाण्याचे बर्फाच्या पठारात रुपांत झाल्याचे दिसून येते. या ठिकाणी काही मुलांनी एकत्रित मिळून क्रिकेटचा डाव मांडून खेळाचा मनसोक्त आनंद घेतल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडिओ जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरे परिसरातील असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
स्केटिंग विथ क्रिकेटचा दुहेरी आनंद
क्रिकेटचा छंद जोपासताना ही मुलं आपल्यातील स्केटिंगची क्षमताही दाखवून देताना दिसते. गोठलेल्या पाण्याचा बर्फ होऊन तयार झालेल्या या पठारावर स्थिर उभारणं जवळपास अशक्यच आहे. ही कसोटी साध्य करण्यासाठी क्रिकेट खेळणारी मुलं आपल्यातील स्केटिंगच कसबही दाखवून देताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून येईल. क्रिकेट विथ स्केटिंग थ्रिल असा दुहेरी आनंदच या मुलांनी घेतल्याचे पाहायला मिळते.
जम्मू काश्मीरमधील तापमानात कमालीची घट
काश्मीरमधील तापमानात सध्या कमालीची घट झाली आहे. याठिकाणचं तापमान हे मायनस ८.५ अंश इतके घसरले आहे. २१ डिसेंबर ते २९ जानेवारी या कालावधीत इथं कडाक्याची थंडी असते. गोठलेल्या तलावाच्या पाण्याच्या परिसरातील अनुचित घटना टाळण्यासाठी जम्मू आणि काश्मीर प्रशासनानं गोठलेल्या तलावांवर चालण्यास मनाई देखील केली आहे.