कणकवली : कणकवली पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीचे काम गेली दोन वर्षे निधीअभावी रखडले आहे. पोलीस स्थानक परिसरात सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून निधी उपलब्ध नसल्याने इतर सुविधा या इमारतीत उपलब्ध करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही इमारत सध्यातरी वापराविना बंद अवस्थेत आहे.कणकवली शहरापासून जवळच कलमठ गावच्या हद्दीमध्ये पोलीस स्थानक उभारण्यात आले आहे. या परिसरातील विस्तीर्ण जागेत वर्षभरापूर्वी नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. सध्या पोलीस स्थानकाचा कारभार ज्या इमारतीतून करण्यात येतो ती इमारत जीर्ण झाली आहे. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा देखील या जुन्या इमारतीत उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली तालुक्यात सुसज्ज पोलीस स्थानक उभारणे काळाची गरज असल्याने राज्याच्या गृह विभागाने नवीन इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने ७७ लाख रूपयांचा अंदाजित खर्च असलेले अंदाजपत्रक तयार केले होते. अंदाजपत्रकानुसार केवळ २० लाखाचाच निधी मंजूर झाला आहे. नूतन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारांना सुमारे ४० लाख रूपये खर्च करून इमारत उभारली आहे. या ठेकेदाराचे देयकही देणे बाकी आहे. त्याचप्रमाणे नूतन इमारतीमध्ये वीज जोडणीबरोबरच फर्निचर तसेच अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी अंतिम निधीची आवश्यकता आहे. गेली दोन वर्षे २० लाखाव्यतिरिक्त निधी न मिळाल्याने नूतन इमारतीचे उर्वरित काम रखडले आहे. अजूनही नूतन इमारतीचे ७० टक्के काम शिल्लक आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उर्वरित निधी मिळावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने नूतन इमारतीचे काम रखडले आहे. अद्ययावत अशा इमारतीसाठी अंतिम ५७ लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी प्राप्त झाल्यास दोन महिन्याच्या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभाग उर्वरित काम पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस स्थानकासाठी तत्काळ निधी मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. (वार्ताहर)प्रस्ताव पाठविला कणकवली पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच निधी मिळाल्यास उर्वरित काम पूर्ण करणे शक्य होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. कन्नादासन यांनी बोलताना दिली आहे.
निधीअभावी काम रखडले
By admin | Updated: November 28, 2014 23:51 IST