ओरोस : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या विविध मागण्या ११ नोव्हेंबरपूर्वी मान्य न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने १२ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.महाआॅनलाईन संग्राम कक्षाकडून या संगणक परिचालकांची फसवणूक झाल्याच्या निषेधार्थ हे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संगणक परिचालकांना शासनाने ८ हजार रूपये मानधन देण्याचे कबूल केले होते. मात्र पदवीधर नसलेल्यांना ३ हजार ५०० रूपये व पदवीधरांना ३ हजार ८०० रूपये मानधन दिले जात होते. मात्र, संगणक कक्ष स्थापन झाल्यापासून कधीही वेळेवर मानधन देण्यात आले नाही. गेली तीन वर्षे वेळोवेळी निवेदन देऊनही याबाबत वरिष्ठांनी विचार केलेला नाही. शासनाने सेवेत कायम करावे. २ हजार रूपये पगारवाढ देण्यात यावी. कपात केलेले वेतन जमा करण्यात यावे. संगणक परिचालकांकडून २०० रूपये शेअर्स म्हणून घेतले आहेत, ते व्याजासह परत करावे.रेल्वे रिझर्व्हेशनचे १ हजार रूपये कपात केले ती रक्कम परत करावी. थकीत वेतन त्वरित द्यावे, ८ हजार रूपयाप्रमाणे दर महिना वेतन द्यावे, जबाबदारीशिवाय जादा कामाचा मोबदला देण्यात यावा, संगणक परिचालकांना प्रवासभत्ता देण्यात यावा, छपाई साहित्य वेळेत मिळावे, आदी १८ मागण्या करण्यात आल्या आहेत.संगणक परिचालकांनी आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला आहे. बुधवारपासून बेमुदत कामबंद, १७ व १८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद गेटजवळ ठिय्या आंदोलन, १९ नोव्हेंबर रोजी सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषदेसमोर सफाई अभियान राबविण्यात येणार आहे. कारभार पारदर्शक व्हावा याकरिता सफाई अभियानाचा उद्देश आहे. आंदोलनातील बदलाची संगणक परिचालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालकांनी केले आहे. (वार्ताहर)
संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन सुरू
By admin | Updated: November 12, 2014 22:53 IST