कणकवली : गेला आठवडाभर कणकवली तालुक्यात वास्तव्यास असलेल्या जंगली हत्तींनी वैभववाडीपर्यंत धडक मारली. हे हत्ती रविवारी वरवडे, किर्लाेसच्या दिशेने रवाना झाल्याने परतीच्या वाटेवर असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.वरवडे येथून जाताना हत्तींनी माड तोडून किरकोळ नुकसान केले. त्यानंतर मालवण तालुक्यातील किर्लोस परिसरात या हत्तींनी मार्गक्रमण केले. गेल्या दोन दिवसांत हत्तींनी वैभववाडी तालुक्यातील लोरे, आचिर्णे परिसरात धुमाकूळ घातला. लोरे येथे एका घराचा दरवाजा तोडून भात फस्त केले होते. तसेच एका शेतकऱ्याच्या बागेतील माड तोडून टाकले होते. आचिर्णे, लोरे परिसरात ऊस, माड आदींचे नुकसान केल्यानंतर हत्तींनी सावडाव, तरंदळेमार्गे कणकवली तालुक्यात येत वरवडे परिसरात नुकसान केल्याचे रविवारी आढळले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता ते किर्लोसच्या दिशेने गेले. वनक्षेत्रपाल आर.एच.पाटील, वनपाल नाना तावडे, वनरक्षक सारीक फकीर, सत्यवान सुतार, मधुकर सावंत यांच्यासह सरपंच आनंद घाडिगांवकर, माजी सरपंच मारूती वरवडेकर, विजय कदम, महेश कदम आदीनी हत्तींना हुसकावण्याचा प्रयत्न केला. कणकवली तालुक्यात येतानाही हत्तींनी हाच मार्ग पकडला होता. त्याच मार्गाने ते जाऊ लागल्याने हत्ती माघारी फिरत असल्याचे वनपाल नाना तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जंगली हत्ती परतीच्या वाटेवर
By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST