वैभव साळकर - दोडामार्ग -दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे प्रत्येक निवडणुकीवेळी ठासून सांगणाऱ्या सर्वच पक्षाच्या राजकारणी आणि पुढारी मंडळींना दोडामार्ग तालुक्याचा विसर पडला की काय? असा प्रश्न आता तालुकावासीयांना पडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात सर्वत्र वायफाय सेवा सुरू झाली असताना, दोडामार्ग तालुका मात्र अद्याप यात मागे असल्याने तालुकावासीयांमधून असा प्रश्न उपस्थित होत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी येणाऱ्या पुढाऱ्यांना मतदारांनी हा प्रश्न विचारल्यास त्यात नवल वाटायला नको, हे मात्र नक्की!सिंधुदुर्गातील आठवा तालुका म्हणजे दोडामार्ग. गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेला हा तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक अविभाज्य घटक आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या तालुक्यातील साक्षरतेचे प्रमाण देखील याठिकाणी चांगले असल्याने संगणक वापरणारे इथले तरुण-तरुणींची संख्या जास्त आहे. या अनुषंगाने इंटरनेटचा वापर देखील तालुक्यातील या मंडळींकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ले आदी तालुक्यात वायफाय सेवेचा शुभारंभ झाला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने ही नक्कीच चांगली बाब आहे. वायफाय सेवेमुळे मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र, या सर्वात दोडामार्ग तालुका अद्याप मागे राहिला आहे. जिल्ह्यात सर्वत्र वायफाय सेवचा घाईगडबडीत शुभारंभ करणाऱ्या राजकीय मंडळी व पुढाऱ्यांना त्यामुळे दोडामार्गचा विसर पडला की काय? असा प्रश्न तालुकावासीयांना सतावत आहे. मोफत जिल्ह्यात दोडामार्ग वगळता इतर तालुक्यात वायफाय सेवा सुरू झाली आहे. यात राजकरण्यांना दोडामार्गचा विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माणझाल्याने त्याचे संतप्त पडसाद सोशल मीडियावरही उमटू लागले आहेत. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या साईटवरून तालुक्यातील तरुणाईने आपला संताप व्यक्त करीत नाराजी दर्शविली आहे. तरुणाईमधून संतापएरव्ही निवडणुका आल्या की, दोडामार्गच्या विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, असे ठासून सांगणारे सर्वच पक्षाचे राजकारणी व पुढारी वायफाय सेवेबाबत मात्र गप्प असल्याने तालुक्यातील तरुणाईमधून संताप व्यक्त होत आहे.
वायफाय सेवेतून दोडामार्गला वगळल
By admin | Updated: September 15, 2014 23:27 IST