देवगड : देवगड तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आंबेरी तिठा येथे शनिवारी सायंकाळी ४ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व परिवाराचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये व सौंदाळे तिर्लोट गावच्या नवलाईदेवी ढोलपथकाच्या तालबद्ध घोषामध्ये त्यांचे भव्य व शानदार स्वागत करण्यात आले. देवगड तालुक्याच्यावतीने पाच पेंडीच्या श्रीफळ व केळीच्या घडाची भेट देऊन त्यांना हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मालवण-कुडाळचे नवनिर्वाचित आमदार वैभव नाईक, सावंतवाडी आमदार दीपक केसरकर, विधानपरिषद आमदार डॉ. दीपक सावंत यांनीही त्यांचे हृद्य स्वागत केले. यावेळी सर्व परिसर शिवसेनेच्या जयघोषाने व जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी दुमदुमून गेला होता.देवगडच्या सीमेवर असलेल्या आंबेरी पुलावरून उद्धव ठाकरे यांची गाडी व ताफा पोहोचताच त्यांचे शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे पारंपरिक औक्षण व दीपआरती करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडोलकर, मीरा-भायंदरच्या संपर्कप्रमुख स्नेहल सावंत, तालुका आघाडीप्रमुख वर्षा पवार, अनिता कोळसुंगकर, स्मिता महांबरे, प्रियांका गुरव व अन्य आघाडी सदस्या यांचा समावेश होता. तालुका उपप्रमुख दिगंबर जुवाटकर, पंचायत समिती सदस्य सुनिल तिर्लोटकर, तालुकाप्रमुख विलास साळसकर व अन्य शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हा संपूर्ण परिसर गजबजून गेला होता.उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या मोटार ताफ्याचे संरक्षण व नियोजन यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तसेच आरोग्य व इमर्जन्सी व्यवस्थापनासाठी एक सुसज्ज रुग्णवाहिकाही यावेळी तैनात ठेवण्यात आली होती.तिर्लोट आंबेरी येथील स्वागतानंतर ४.३० वाजता पडेल कँटीनमार्गे देवगडकडे प्रयाण करीत असताना मार्गावर पडेल कँटीन, वाडा चांभारभाटी व वाडातर येथे उद्धव ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी गाडी थांबवून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना महिला कार्यकर्त्यांचे औक्षण व ओवाळणी स्वीकारली. ५ वाजता ते जामसंडे येथून कुणकेश्वर येथे रवाना झाले. तत्पूर्वी दाभोळे-इळये पाटथर येथील पाटणकर कुटुंबियांची कौटुंबिक व वैयक्तिक भेट घेण्यासाठी हा काफिला काहीवेळ तेथे थांबला होता. तेथे काही काळ कुटुंबियांसह व्यतित केल्यानंतर पुन्हा कुणकेश्वरकडे हा काफिला निघाला.कुणकेश्वर मंदिरामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सत्कार सोहळाही झाला. श्री कुणकेश्वराचे दर्शन उद्धव ठाकरे यांनी सपत्निक घेतले. यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
उद्धव ठाकरेंचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत
By admin | Updated: November 23, 2014 00:38 IST