मुंबई - देशातील सगळ्या खासगी रुग्णालयांत आजपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना तसेच 45 वर्षांवरील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांत लशीच्या प्रत्येक डोसची किंमत जास्तीत जास्त 250 रुपये ठेवली आहे. मात्र, बिहारमध्ये ही लस लोकांना मोफत टोचली जाणार आहे. आपण पुन्हा सत्तेत आलो, तर बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनालस मोफत दिली जाईल, असे आश्वासन भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खासगी रुग्णालयातही मोफत लस देण्याचं आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिलंय.
माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सदस्यांना कोविड लस आणि तीही सरकारी रुग्णालयात विनामूल्य मिळेलच. पण, माझ्या मतदारसंघातील जे 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली तरी, त्यांना ती मोफत देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. प्रत्येकास सुरक्षित आणि निरोगी आयुष्य मिळावे हेच आमचं ध्येय असल्याचं आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय. नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.
कोरोनाची लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले नेते
कोरोना प्रतिबंधक लस घेणारे शरद पवार हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांवरील वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यामुळे, सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लस देण्यात आली असून कोरोनाची लस घेणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या आहेत.
मोदींनीही घेतली कोरोना लस -
देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.