देवरुख : संगमेश्वर तालुक्यातून गॅस वाहून नेणारी पाईप गेल कंपनीमार्फ त नेण्यात आली. याच पाईपलाईनच्या खोदाईच्या वेळी हादरे बसून पूर गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर कोसळली आणि विद्युत मोटारसह सर्व सामान विहिरीतच कोसळले. यामुळे पाणी योजना पूर्णपणे ठप्प झाल्याचे सप्तलिंगी बचाव मोहिमेच्या वेळी सत्य सामोरे आले. सरपंच दर्शना झेपले यांच्यासह ग्रामस्थांनी ‘गेल कंपनीकडून आमचं पाणी गेलं, आता पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे’ असा टाहो फोडला.सृष्टी नेचर क्लबतर्फे हरपुडे ते वांद्री या ३० किलोमीटर अंतरातील सप्तलिंगी नदीपात्राचा अभ्यासदौरा करण्यात आला. यावेळी पूर गावातील नदीच्या समस्या जाणून घेताना विहीर कोसळण्याची बाब सरपंच झेपले यांनी निदर्शनास आणून दिली. सृष्टी नेचर क्लबतर्फे अध्यक्ष सुरेंद्र माने, सल्लागार युयुत्सू आर्ते यांच्यासह या मोहिमेत प्रमोद हर्डीकर, गजानन गुरव, सुभाष पाटील, विनोद गोपाळ, राजा गायकवाड, अक्षय जोशी, राजू वणकुद्रे, जयवंत वाईरकर, अण्णा बेर्डे, भाई भोसले सहभागी झाले होते. पाटगाव सांब मंदिर बैठकीनंतर पूर किरदाडी भागात नदीपात्राची पाहणी करण्यात आली. यावेळी सरपंच दर्शना झेपले, ग्रामसेविका एस. ए. तोरस्कर, सदस्य भाऊ डोंगरे, पोलीसपाटील सुरेश वेल्ये आदी उपस्थित होते. पूर गावात १७५ घरे आहेत. काही घरांना विहिरींचा पाणीपुरवठा होतो. मात्र, अनेक घरे केवळ नदीपात्रातील नळपाणी पुरवठ्यावर जगणारी आहेत. हीच नळपाणी योजना गेल कंपनीच्या खोदाईमुळे पूर्णपणे ढासळून ठप्प झाल्याने पूरवासीयांना गेले वर्षभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत सर्व ग्रामस्थांतर्फे पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे, असेही सरपंच झेपले यांनी सांगितले.सृष्टी नेचर क्लब आता या पाणी योजनेच्या उभारणीसाठी पाठपुरावा करणार असून, कागदपत्रांची तपासणी करुन न्याय मिळवून देणार आहे. गेल कंपनी आणि पंचायत समिती यांच्याकडे हा पाठपुरावा केला जाणार आहे.पूर गावातून वाहणारी सप्तलिंगी नदी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी पूर - किरदाडी ग्रामपंचायत पुढाकार घेणार असून, नदीपात्रात कोणताही कचरा टाकणार नाही, याची हमी ग्रामस्थांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
आमचं हक्काचं पाणी गेलं
By admin | Updated: May 28, 2015 00:55 IST