सुशांत पवार - सांगेली कलंबिस्त हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. चहूबाजूंनी दऱ्या-डोंगरांनी वेढलेले गाव मध्यभागी सुशोभित दिसत आहे. या निसर्गसृष्टीत कलंबिस्त गावापासून दोन किलोमीटर अंतरावर ‘धामनमळा’ येथे सातेरी धबधब्याचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. उंच डोंगरांच्या कड्यावरून हसत, खिदळत, फे साळत कोसळणारा सातेरी धबधबा ढोल-ताशांच्या, सनईच्या स्वरात पर्यटकांना हाक देत आहे. पण कलंबिस्त गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या तेरेखोल नदीवरून पाणी जाण्यासाठी मार्गाची गरज आहे. त्यामुळे सातेरी धबधब्यावर पर्यटकांची रीघ होत नाही. त्यामुळे हा धबधबा पर्यटनापासून वंचित आहे. या निसर्ग सृष्टीत पर्यटकांसाठी पोषक वातावरण आहे. तसेच लहान-मोठे नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. हिरवीगार सजलेली निसर्गसृष्टी पाहून मन मोहून जाते. कलंबिस्त गावाला नावलौकिक मिळवून देणारा सह्याद्रीच्या कुशीत आणि शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत हसत, खिदळत चैतन्य निर्माण करणारा सातेरी धबधबा आजही पर्यटकांना साद घालत आहे. सातेरी धबधब्याच्या ओलाव्याने कलंबिस्त गावाला विशाल अशी निसर्गसृष्टी प्राप्त झालेली आहे. या निसर्ग सृष्टीचा आस्वाद घ्यायला कुणीतरी इकडे यावे लागते. त्यासाठी सातेरी धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आजही तटस्थ उभा आहे. सातेरी धबधब्याच्या पायथ्याशी असलेले कलंबिस्त गावचे जागृत देवस्थान सातेरी मंदिर आजही प्रसिध्द आहे. त्यामुळे पर्यटकांना येथे देवदर्शनही घेता येऊ शकते. सुंदर धबधब्याचे दर्शननिसर्ग समृद्धीने नटलेले कलंबिस्त हे गाव पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. त्यामुळे येथील सातेरी धबधबाही पर्यटकांना उपलब्ध झाला तर पर्यटकांसह गावालाही नवी ओळख प्राप्त होऊ शकते. ग्रामपंचायतीने धबधब्यापर्यंत पर्यटकांना पोहचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटकांनाही या सुंदर धबधब्याचे दर्शन होईलच पण कलंबिस्त गावाचाही विकास होईल.- रवींद्र तावडे, कलंबिस्त-गणेशवाडी
सातेरी धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत!
By admin | Updated: July 28, 2015 00:31 IST