प्रकाश वराडकर -रत्नागिरीजाकादेवीतील सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाच्या बॅँक शाखेवर २८ नोव्हेंबर २०१३ रोजी दुुुपारी ५ जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दहशत निर्माण करण्यासाठी अंदाधुंद गोळीबार करून एका कर्मचाऱ्याचा बळी घेतला व सुमारे १० लाखांचा ऐवज घेऊन इलेंट्रा कारने ते पसार झाले. अवघ्या दहा मिनिटात खेळ खल्लास, अशी ही स्थिती होती. पोलिसांची खरी अग्निपरीक्षा होती. पहिल्या आठ दिवसांत तपासाला दिशाच मिळत नव्हती. स्थानिकाने माहिती दिल्यानतंर तपासकामातील कोंडी फुटली व तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी तुषार पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शहर पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईत जाऊन मोहीम फत्ते केली. बॅँक दरोड्यातील आरोपींना पकडणे सोपे नव्हते. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांनी तपासाचे खरे स्किल वापरले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी गॅरेजमध्ये कामगाराच्या वेशात काम करण्यापासून विविध वेशांतर हुबेहुब वठवित एकेका गुन्हेगाराला अलगद जाळ्यात पकडले. पाच आरोपींना मुंबईत, तर एकाला जाकादेवी परिसरात अटक झाली.दरोड्यातील राजेंद्रसिंंग नवलकिशोरसिंंग राजावत (२५, कल्याण), हरेशगिरी गुणवंतगिरी गोस्वामी (२५, कल्याण), शिवाजी ऊर्फ सागर बाळू विसे (२५), प्रशांत शेलार (मुंबई), निखिल मारुती सावंत (२४, डोंबिवली, मुंबई), प्रथमेश संतोष सावंत (१८, राई, सावंतवाडी, जिल्हा - रत्नागिरी) या सहा आरोपींना अटक झाली. आरोपींकडून रिव्हॉल्व्हर, पैसे हस्तगत करण्यात आले. दरोड्यासाठी वापरलेली इलेंट्रा कार ही दरोड्यातील आरोपी प्रशांत शेलार याचे नातेवाईक अनिल भोईर यांची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही गाडीही रत्नागिरी पोलिसांनी जप्त केली.जिल्ह्यात असा दरोडा पडण्याची ही पहिलीच घटना होती. बॅँकेच्या शाखेवर दुपारी १.२९ ते १.३८ या दहा मिनिटांच्या वेळात पाच जणांनी सशस्त्र दरोडा घातला होता. महिला कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावत ९ लाख ७० हजारांची रोख रक्कम घेऊन व दोन कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून दरोडेखोरांनी इलेन्ट्रा गाडीने पलायन केले होते. गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पळालेल्या दरोडेखोरांपैकी चारजण सावर्डे येथून अन्य वाहनाने पसार झाले, तर एकजण इलेन्ट्राने पुढे गेला. त्यामुळे पोलिसांनाही त्यांनी चकविले. गाडीचा ४०० हा नंबरही बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गाडीची नंबरप्लेट नंतर राई परिसरातच एका ठिकाणी आढळून आली होती. अलिशान गाडी घेऊन वावरत असल्याने दरोडेखोरांबाबत कोणाला संशय आला नाही. त्यामुळे दरोड्यानंतर अलिशान गाडी पसार झाली होती. याप्रकरणी आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. दरोड्यासारख्या महत्त्वाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा छडा लावणे जिकरीचे व आव्हानात्मक काम होते. पहिल्या आठवड्यात भरकटलेला तपास स्थानिक नागरिकाने महत्त्वाची माहिती दिल्याने यशस्वी झाला.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी केले होते वेशांतर
By admin | Updated: July 20, 2014 22:46 IST