कुडाळ : १५ ते २० जणांच्या जमावासह घरात घुसून पतीला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे कुडाळ तालुका माजी उपाध्यक्ष विजय राणे यांच्या पत्नी भक्ती राणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वैभव नाईक यांच्यावर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आपल्याला मोबाईलवरून मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार विजय राणे यांनी कुडाळ पोलिसांत नोंदविली होती, तर रात्री उशिरा विजय राणे यांच्या पत्नी भक्ती राणे यांनीही नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज, बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरात एकटीच असताना घरातील पडवीत १५ ते २० लोक आले. यामध्ये ओळखीचे वैभव नाईक यांच्यासह निशांत चंद्रकांत तेरसे, दिलीप अर्जुन ढवळ (रा. घोडगे), धोंडी वसंत मडवळ (रा. घोडगे) यांचा समावेश होता. या सर्वांनी माझ्या पतीला काही कारणावरून शिवसैनिकांच्या आड आलात तर हातपाय तोडून, मारण्याची धमकी दिली आहे आहे. या तक्रारीवरून वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी निशांत तेरसे, दिलीप ढवळ, धोंडी मडवळ यांच्यासह आणखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)वातावरण तंगदरम्यान, सायंकाळपासून कुडाळ पोलिसांत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ वातावरण तंग होते. यावेळी काँग्रेसचे संजय पडते, विनायक राणे, आनंद भोगले, दीपक नारकर, विजय राणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
धमकीप्रकरणी वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल
By admin | Updated: August 21, 2014 00:27 IST