वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्ज छाननीमध्ये प्रभाग क्र. ४ अ मधील प्रणाली उर्फ प्रमिला जाधव व मिलिंद वेंगुर्लेकर अशी दोन नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली आहेत. त्यामुळे प्रभाग क्र. ४ मधील अनुसूचित जातीसाठीची जागा रिक्त राहणार असून खुल्या महिला आरक्षणाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे वेंगुर्लेत आता केवळ एकूण सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. १८ जानेवारीला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी २३ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या उमेदवारी अर्जांची छाननी आज (दि. २४) रोजी झाली. या छाननीमध्ये प्रभाग क्र. ४ अ अनुसूचित जाती गटासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रणाली उर्फ प्रमिला जाधव व मिलिंद वेंगुर्लेकर यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरविण्यात आले. प्रणाली उर्फ प्रमिला लाडू जाधव यांनी भाजपाकडून, तर मिलिंद भाऊ वेंगुर्लेकर यांनी काँगे्रसकडून प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु, प्रणाली उर्फ प्रमिला लाडू जाधव यांना तीन मुले व मतदार यादीत चुकीचे नाव, तर मिलिंद वेंगुर्लेकर यांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याच्या कारणातून त्यांचे दोन्ही अर्ज आजच्या छाननीमध्ये अवैध ठरले. या प्रभागामध्ये वामन कांबळी अपात्र ठरल्यामुळे ही जागा रिक्त होती. प्रभाग क्र. ४ अ अनुसूचित जाती गटासाठी फक्त भाजप व काँग्रेसनेच उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादीने ही जागा रिक्त सोडली होती. तर शिवसेना-भाजप युुतीमुळे याठिकाणी शिवसेनेने भाजपला पाठींबा देण्याचे ठरले होते. मात्र, दोन्ही अर्ज अवैध ठरल्याने आता या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला गट या एकाच जागेसाठी लढत होणार आहे. फिलोमिना कॉर्डोज अपात्र ठरल्याने या प्रभागातील सर्वसाधारण महिला ही जागा रिक्त आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ५ जानेवारी असून त्यानंतर ६ जागांसाठी किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. परंतु सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार मोहीम सुरू केली आहे. सर्वात अगोदर मतदारापर्यंत कोण पोहोचतो, यासाठी पक्षापक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. यापुढील दिवस हे आता प्रचाराचे असून उमदेवार मतदारांच्या भेटीगाठी घेऊन समस्या जाणून घेताना दिसणार आहेत. (प्रतिनिधी)
दोन अर्ज छाननीत अवैध ठरल्याने पोटनिवडणूक आता सहा जागांसाठी
By admin | Updated: December 24, 2014 23:11 IST