देवरू ख : मुंबई-गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे कंटेनर व मारुती कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन तरुण ठार झाले आहेत. या घटनेत पुण्यातील दोन तरुणींसह तिघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी ८ वाजता झाला. जहीर सादीक अन्सारी (४०, पिंपरी, पुणे) आणि सुमित राय (दिल्ली) अशी मृतांची नावे आहेत. कंटेनर चालक रमाकांत यादव (उत्तरप्रदेश) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात कळविले आहे. रमाकांत यादव कंटेनर (एमएच- ०६, एक्यू- ८८६९) घेऊन भिवंडीहून रत्नागिरी येथील फिनोलेक्स कंपनीकडे जात होते. जहीर सादीक अन्सारी हे मारुती कार (एमएच-१४, इव्ही-९७८६) घेऊन रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने येत होते. कंटेनर कुरधुंडा येथे आला असता, मारुती कारचालकाचे नियंत्रण सुटून कार थेट कंटेनरवर आपटल्याचे यादव यांनी नमूद केले आहे. हा अपघात सकाळी ८च्या सुमारास घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यातील जहीर सादीक अन्सारी हे जागीच ठार झाले. सुमित राय (दिल्ली), केतन गुप्ता (दिल्ली), विजेता व श्वेता (पुणे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी तत्काळ डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना यातील सुमित राय हे मृत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी) माहिती अपूर्णच अपघातात जखमी मृत व जखमी झालेले कामधील प्रवासी नेमके कुठून आले होते आणि कोठे जात होते, ते सहलीसाठी म्हणून गोव्याकडे गेले होते का, याबाबतची माहिती पोलिसांनाही मिळत नव्हती. अपघातातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याने पोलीसही अंधारातच होते.
कंटेनर-कार अपघातात दोघे ठार
By admin | Updated: June 1, 2015 23:52 IST