दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव हे केवळ मागासवर्गीय समाजाचे असल्यानेच प्रशासन त्यांच्यावर अन्याय करीत आहे. इतर विषय समितीच्या सभापतींना गाड्या दिल्या असताना जाधव यांनाच गाडी न देऊन प्रशासन दुटप्पी धोरण अवलंबित आहे. ही जिल्ह्यासाठी घृणास्पद बाब असल्याने येत्या आठ दिवसांत जर प्रशासनाने आपली भूमिका बदलली नाही, तर आरपीआय समाज कल्याण सभापतींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव चंद्रकांत कसबे यांनी दिला.येथील स्रेह रेसिडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, कोकण प्रदेश उपाध्यक्ष रमाकांत जाधव, गणपत जाधव, युवा आघाडी प्रमुख संतोष वराडकर, उमेश हसापूरकर आदी उपस्थित होते.यावेळी कसबे म्हणाले, राज्यात आरपीआयची सेना व भाजपाशी युती आहे. पण सत्तेत समानतेची संधी आरपीआयला मिळाली नाही.त्यामुळे यापुढे समसमान संधी सत्तेत मिळायला हवी, अशी मागणी आरपीआयची राहणार आहे. केवळ निवडणुका आल्या की आरपीआयच्या कार्यकर्त्यांना जवळ करायचे आणि निवडणुका संपल्या की वाऱ्यावर सोडायचे, अशी भूमिका आजपर्यंत इतर राजकीय पक्षांची राहिली आहे. त्यामुळे यापुढे भविष्यात जर सत्तेमध्ये समान संधी मिळाली नसेल, तर आरपीआय कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही. जो पक्ष सन्मान देईल, त्याच्याशी जवळीक साधली जाईल. न पेक्षा स्वबळावर सुध्दा निवडणूक लढविण्यास आरपीआय सज्ज आहे, असा इशारा कसबे यांनी यावेळी दिला. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव आणि प्रशासन यांच्यामध्ये गाडीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना कसबे म्हणाले, जिल्ह्याच्या समाज कल्याण सभापतींवर गाडीशिवाय चालत फिरण्याची वेळ येते, ही जिल्हावासीयांसाठी घृणास्पद बाब आहे. अंकुश जाधव हे एक मागासवर्गीय समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर जाणूनबुजून प्रशासनाकडून अन्याय होत आहे. ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे महत्त्वाचे नाही. मात्र, आरपीआय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील. इतर विषय समिती सभापतींना गाड्या आहेत. मग जाधव यांनाच गाडी का नाही? याचा जाब जिल्हा प्रशासनाला द्यावा लागेल. प्रशासनाच्या हा दुटप्पीपणा असून, या विरोधात येत्या आठ दिवसात आरपीआय आंदोलन छेडेल, असा इशाराही चंद्रकांत कसबे यांनी दिला. (प्रतिनिधी)जिल्ह्याच्या समाज कल्याण सभापतींवर गाडीशिवाय चालत फिरण्याची वेळ येते, ही जिल्हावासीयांसाठी घृणास्पद बाब आहे. अंकुश जाधव हे मागासवर्गीय समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर जाणूनबुजून प्रशासनाकडून अन्याय होत आहे. - चंद्रकांत कसबे, महाराष्ट्र प्रदेश सचिव, आरपीआयकांबळे : आरपीआय स्वबळावर लढणारदरम्यान, कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत आरपीआयची सेना-भाजपने फसगत केल्याची कबुलीही यावेळी जिल्हाध्यक्ष शरद कांबळे यांनी दिली. राज्यात युती असताना कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत आरपीआयला जागा नाकारून सेना-भाजपवाल्यांनी स्वत:चेच नुकसान केले. परिणामी यापुढे कसई दोडामार्गमधील अनुभव पाठीशी असल्याने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कुणाच्या पाठीमागे फरफटत न जाता प्रसंगी आरपीआय स्बळावर निवडणूक लढवेल, असे कांबळे म्हणाले.
समाजकल्याण सभापतींना गाडी देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ चंद्रकांत कसबे : प्रशासनावर जातिभेदाचा आरोप
By admin | Updated: May 25, 2016 23:25 IST