संदीप बोडवे - मालवण -युती शासनाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. मात्र, याचा केंद्रबिंदू राहिलेल्या मालवणमध्येही पर्यटन उद्योगाचा म्हणावा तसा विस्तार झालेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती, निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेने संपन्न असलेले शांत समुद्रकिनारे असतानाही मालवणचे पर्यटन रडतखडत सुरू आहे. स्थानिकांनी येथील पर्यटन व्यवसायाला उभारी देण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. शासनकर्त्यांकडे पर्यटन विकासाचे कोणतेही ‘व्हिजन’ नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.सर्वसमावेशक पर्यटन धोरणच नसल्याने प्रशस्त किनारपट्टी लाभूनही पर्यटन व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीआरझेडच्या अटींमुळे न्याहरी-निवासधारक अडचणीत आहेत. सागरी पर्यटनातील स्रॉर्कलिंग, स्कुबा डायव्हींग, पॅरासेलींग व वॉटर स्पोर्टस्ना परवान्यांची प्रतीक्षा आहे. किनारपट्टीवरील एकंदरीत सर्वच पर्यटन व्यवसायावर अनधिकृतचा शिक्का बसलेला आहे.अनधिकृत शिक्का कधी पुसणारमालवणमधील वाढत्या पर्यटनामध्ये सागरी पर्यटनाचा मोठा वाटा आहे. येथील सागरी पर्यटनाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. तालुक्यात मागील पाच-सहा वर्षांपासून सागरी पर्यटनात नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, बहुतांश सागरी पर्यटनामध्ये नियमावलीच तयार करण्यात आलेली नसल्याने या पर्यटन व्यावसायिकांना परवाने देण्यात आलेले नाहीत. यामुळे येथील सागरी पर्यटनावर अनधिकृतचा शिक्का बसलेला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे येथील सागरी पर्यटनात दर्जा असूनही ते अधिकृत होऊ शकलेले नाही. स्रॉर्कलिंग, स्कुबा डायव्हींग, पॅरासेलिंग तसेच विविध वॉटर्स स्पोर्टस्धारकांना याचा फटका बसत आहे. व्यावसायिक यामुळे नाराज आहेत.सी-वर्ल्ड सर्वसहमतीने व्हावासी-वर्ल्डसारखा पर्यटनात आमुलाग्र बदल घडविणारा प्रकल्प तालुक्यात उभा राहिल्यास मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटन उद्योगाला हत्तीचे बळ येणार आहे. मात्र, हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे रखडला आहे. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प केल्यास मालवणच्या पर्यटनात मोठा बदल घडून येणार आहे. ग्रामीण रुग्णालयात सुविधांची वानवामालवण येथील शासकीय रूग्णालयात सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर्स आणि अन्य सुविधांची समस्या नेहमीचीच आहे. ग्रामीण रूग्णालयात प्रयोगशाळा तज्ज्ञ जूनपासून तर पाणी तपासणी प्रयोगशाळेतील केमिस्ट उपलब्ध नसल्याने रूग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. रूग्णालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अपुरे डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्गामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. गोरगरीब रूग्णांच्या आरोग्य सुविधेवर याचा परिणाम होत आहे.स्थानिकांना विश्वासात न घेतल्यामुळे वायंगणी व तोंडवळी गावातील लोकांचा या प्रकल्पाला प्रखर विरोध आहे. २५० एकरवरून वाढवून थेट १३९० एकर जमिनीचे संपादन होणार असल्याने स्थानिकांत भीती निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक व शासनामध्ये दरी निर्माण झाली आहे.भाजीमार्केट वापराविना पडून आहे. शहरातील बाजारपेठ रस्ता रूंदीकरण अद्याप होऊ शकलेले नाही. अरूंद रस्ते व पार्कींगच्या समस्येवर बाजारपेठेतील व्यापारावर परिणाम दिसून येत आहे.मालवण तालुक्याला देवबागपासून आचरेपर्यंत विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. येथील तारकर्ली, देवबाग, वायरी, मालवण, चिवला, तोंडवळी, तळाशिल व आचरा यांसारखे समुद्रकिनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. किनारपट्टी भागात पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन विकास महामंडळाच्या मान्यतेने निवास न्याहरीची व्यवस्था केली आहे. मात्र या भागात असलेल्या सीआरझेडच्या जाचक अटींमुळे नव्या बांधकामांना परवानगी नसल्याने निवास न्याहरीधारकांवर प्रशासनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.सर्जेकोट बंदराचे उद्घाटन झाले असले तरी अद्याप या बंदराची पूर्ण क्षमतेने सुरुवात झाली नाही. दुर्लक्षित मत्स्य व्यवसायसर्जेकोट बंदराचा विकास व्हावा, अशी स्थानिक मच्छिमारांची गेल्या ३० वर्षापासूनची मागणी होती. सुमारे ३३ कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या या अद्ययावत बंदराचे उद्घाटन यावर्षी मार्च महिन्यात करण्यात आले. मात्र बंदर पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेले नाही. मालवण बंदरात मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय चालतो. यामध्येही पारंपरिक व पर्ससीननेटधारकांत वाद सुरू आहेत. नियोजनशून्य पालिका प्रशासनमालवण नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील बहुचर्चित भुयारी गटार प्रकल्प गेली चार वर्षे रखडला आहे. अपुऱ्या व अर्धवट कामामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. याचा नागरिकांना नेहमीचा त्रास सहन करावा लागतो. खराब रस्त्यांमुळे पर्यटन शहराची प्रतिमाही खराब झाली आहे. नाट्यगृह तोट्यात चालले आहे.
मालवणातील पर्यटन रडतखडत
By admin | Updated: November 9, 2014 23:29 IST