कणकवली : थिएटर अॅकॅडमी पुणे आणि अक्षर सिंधु कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मराठा मंडळाच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगसंगीत’ विभागीय एकांकिका स्पर्धेला ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या एकांकिका स्पर्धेस गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणांहून १४ संघ सहभागी होणार आहेत. अस्तंगत होत चाललेल्या संगीत नाटक चळवळीला बळ मिळावे या उद्देशाने ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गद्य व पद्य एकांकिका या स्पर्धेत सादर केल्या जाणार आहेत. या स्पर्धेत स्वप्नवेध युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गची ‘नाते संस्कृतीचे’, डी.बी.जे. चिपळूणची ‘अविट गोडी’, विजय पेडणे यांची ‘रक्तसूत’, रंगखाम कणकवली यांची ‘संगीत कवडसा’, सातेरी नाट्यमंडळ सातोसे यांची ‘वैरी रक्ताचा’, गुरुकृपा नाट्यमंडळाची ‘संपूर्ण दर्शन’ या पद्य एकांकिका सादर होणार आहेत.तर गद्य एकांकिका विभागात समर्थ कलाविष्कार देवगडची ‘इन आॅफ द बिगिनिंग’, स्वप्नवेध सिंधुदुर्गची ‘आभास’, नवांकुर मालवणची ‘सायलेंट स्क्रीम’, डी.बी.जे. चिपळूणची ‘अनुत्तरीत’, फणसगाव देवगडची ‘आगासे पाटील’, रंगखाम कणकवलीची ‘कळत्या नकळत्या वयात’ आणि आयडियल इंग्लिश स्कूलची ‘क्लोन’ या एकांकिका सादर होणार आहेत. परीक्षक म्हणून लेखक सुनील देव (मुंबई), तालवादक सागर टिपरे (पुणे), सुहास वरुणकर (कणकवली) हे काम पाहणार आहेत. (वार्ताहर)
कणकवलीत आजपासून एकांकिका स्पधा
By admin | Updated: November 7, 2014 23:40 IST