साटेली भेडशी : महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या तिलारी धरणाच्या पाण्यावर तसेच तेरवण मेढे धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती करून ही वीज स्थानिक गावांसह गोवा राज्याला वितरीत केली जात असताना तिलारी धरणाच्या परिसरात लावण्यात आलेली लाईटस् गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्यावेळी तिलारी धरणाच्या परिसरात नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांना अंधारात फिरावे लागत असून अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त होत आहे. तिलारी प्रकल्पांतर्गत कार्यकारी अभियंता शिर्षकामे विभाग १ कोनाळकट्टा यांच्यामार्फत तिलारी धरण क्षेत्रावर तसेच कोनाळ येथील खळग्यातील धरण या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून लाईटची व्यवस्था करून साठ ते सत्तर ठिकाणी विजेचे खांब उभे करून त्यावर हजार रुपये किमतीचा एक बल्ब याप्रमाणे हलक्या दर्जाचे बल्ब बसविण्यात आले आहेत. हे बल्ब गेल्या दोन महिन्यांपासून बंदावस्थेत आहेत. तेथील एक ट्रान्सफार्मर जळालेला आहे. तिलारी धरणाचा परिसर गेल्या दोन महिन्यांपासून अंधारात आहे. रात्रीच्यावेळी धरणाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था अत्यंत आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जंगलमय अशा भागातील जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे सुरक्षा रक्षकांना फिरणेही अवघड झाले आहे. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
तिलारी धरण परिसर महिनाभर अंधारात
By admin | Updated: October 20, 2014 22:31 IST