दस्तुरी (खेड) : मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेत १७ दिवसांनी सापडलेले मृतदेह वाहक विलास देसाई आणि प्रवासी धोंडू कोकरे यांचे असल्याचे डीएनए चाचणीत निष्पन्न झाले आहे. तब्बल ४८ दिवस रुग्णालयात ठेवलेल्या या मृतदेहांवर बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.दि. २ आॅगस्ट रोजी रात्री पावणेअकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान सावित्री नदीवरील पूल तुटला आणि त्यात दोन एस. टी. बसेस वाहून गेल्या. दि. ३ रोजी सकाळी ७ पासून वाहून गेलेल्या या वाहनांचा व प्रवाशांचा प्रशासनाच्यावतीने शोध सुरू होता. तब्बल बारा दिवसांनी एसटी बसेस व तवेरा गाडी बाहेर काढल्यानंतर प्रशासनाच्यावतीने ही शोध मोहीम थांबवण्यात आली. परंतु या दुर्घटनेतील आणखी काही मृतदेह बेपत्ता होते.दुर्घटनेनंतर १७व्या दिवशी दि. १९ आॅगस्ट रोजी वेळासनजीक बाणकोट खाडीकिनारी गस्ती पथकातील पोलिसांना दोन मृतदेह सापडले. परंतु ते छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे ते कोणाचे आहेत, हे नेमके कळणे अवघड होते. प्रशासनाच्यावतीने महाड येथील शासकीय रुग्णालयात सर्व बेपत्तांच्या नातेवाईकांचे डीएनए घेण्यात आले होते. दि. १९ आॅगस्टला हे दोन मृतदेह आढळून आल्यानंतर त्या मृतदेहांचे सॅम्पल काढून डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.डीएनए अहवाल हाती आल्यानंतर हे मृतदेह जयगड-मुंबई एसटी बसचे वाहक विलास काशिनाथ देसाई (फुणगूस) व प्रवासी धोंडू बाबाजी कोकरे (खंडाळा-वरवडे) यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांना या संदर्भात कळवण्यात आले. त्याप्रमाणे बुधवारी देसाई व कोकरे यांच्या नातेवाईकांनी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ताब्यात घेतले.मुळात पाण्यात १७ दिवस राहिल्यामुळे छिन्नविछिन्न अवस्था झालेल्या या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे कोठे? असा प्रश्न नातेवाईकांना पडला. ही माहिती आमदार संजय कदम यांना समजल्यावर त्यांनी तत्काळ या मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन या मृतदेहांवर चिंचघर-प्रभूवाडी येथे अंत्यसंस्कार करावेत. आपल्याला सर्वतोपरी मदत ग्रामस्थांकडून करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजय देसाई व धोंडू कोकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसपाटील विष्णू कदम, अरुण पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह चिंचघर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)वाहक विलास देसाई व प्रवासी धोंडू कोकरे यांचे मृतदेह असल्याचे डीएनए चाचणीत निष्पन्नतब्बल ४८ दिवस राहिले रुग्णालयात मृतदेह
‘त्या’ मृतदेहांची पटली ओळख
By admin | Updated: October 6, 2016 01:15 IST