जामसंडे : कासार्डे येथे सोमवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये देवगड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी म्हैशींसह नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. आमदार प्रमोद जठार यांनी या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीला वाचा फोडण्यासाठी नरेंद्र मोदींना भेटून त्यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार प्रमोद जठार यांनी कोकण दूध डेअरीची स्थापना केल्यामुळे देवगड तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेऊन दूध व्यवसाय चालू केला. बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी कोकण दूध डेअरीने हमीपत्र दिले. सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रति लिटर ३५ ते ४० रुपये दुधाचा दर मिळाला. परंतु तोच दर टप्प्याटप्प्याने १५ रुपयांपर्यंत खाली आला. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादन कमी झाले. परिणामी बँकेचे हप्ते थकले. आज बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारात येवून कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत. घर तारण ठेवल्यामुळे घरांचा लिलाव होईल याची भीतीसुद्धा या शेतकऱ्यांना वाटत आहे.आमदार जठार यांनी दूध डेअरी सुरु करताना गावागावात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर सबसिडी मिळवून देतो. तसेच चारा, औषधोपचार, घरापर्यंत येवून दूध संकलन करतो अशी आश्वासने दिली होती. परंतु त्यामधले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच आमदार जठार यांच्याशी याबाबत संपर्क करून व्यथा मांडल्या असता त्याबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, अशी माहिती या पत्रकार परिषदेत उपस्थित दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. यावेळी बापर्डे गावातील सुनिल सकपाळ, संजय लाड, संदीप नाईकधुरे, राजेंद्र नाईकधुरे, हृदयनाथ नाईकधुरे, संतोष नाईकधुरे, विजय नाईकधुरे, राकेश नाईकधुरे, श्रीकांत नाईकधुरे, विश्वास नाईकधुरे तसेच कुणकेश्वरमधील अभय पेडणेकर, नरेंद्र घाडी, हनुमंत कांबळी आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते. आम्हाला आमदारांकडून अपेक्षित न्याय मिळाला असता तर याबाबत उच्चस्तरावर दाद मागण्याची गरज लागली नसती. त्यामुळे या विषयाबाबत मोदींचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)याला काँग्रेसचे पुढारीच जबाबदार : सदाशिव ओगलेदूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान काँग्रेसनेच केले अशी टीका भाजपा तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाची खरी सुरुवात प्रमोद जठार यांनी केली. येथील शेतकऱ्याच्या घरात त्यांच्या हक्काचा पैसा जावा म्हणून नाधवडे येथे कोकण दूध डेअरी सुरु केली. ही डेअरी योग्यप्रकारे चाललेली असताना काँग्रेसचे मंत्री आणि सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्र्यांनी गोकुळ दूध सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणून कोकण दूध बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गेल्या आॅक्टोबरपासून येथील शेतकऱ्यांनी गोकुळ दूधला दूध घालणे सुरु केले. मात्र, आता गोकुळ डेअरीने दुधाला कमी दर देणे सुरु केल्यामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार काँग्रेसचे पुढारीच आहेत. याला पुरावा म्हणजे देवगडच्या गेल्या वर्षीच्या आमसभेमध्ये बापर्डेचे तत्कालीन सरपंच नाईकधुरे यांनी पालकमंत्री नारायण राणेंच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. हेच नाईकधुरे आता कोकण दुधमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत आहेत. या शेतकऱ्यांनी जी कर्जप्रकरणे केली त्याचे अनुदान नाबार्डकडून मिळाले पाहिजे. त्यासाठी बँकेने प्रस्ताव नाबार्डकडे सादर करणे गरजेचे आहे. काँग्रेसची सत्ता असताना अशाप्रकारचे राजकारण करून शेतकऱ्यांच्या रोजीरोटीशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका सदाशिव ओगले यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
‘ते’ शेतकरी मोदींना भेटणार
By admin | Updated: October 12, 2014 23:34 IST