कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना तसेच भाजपाकडे कोणताही महत्वाचा मुद्दा नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसलेल्या दहशतवादाचा मुद्दा वैभव नाईक पुढे आणत आहेत. ही जनतेची फसवणूक असून त्याला कोणीही भुलणार नाही, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदानकेंद्र नाही. त्यामुळे विरोधकांकडून दहशतवादाच्या मुद्याचा करण्यात येणारा बाऊ निरर्थक आहे. कुडाळ मतदारसंघाचा आपण कोणत्या पद्धतीने विकास करणार याबाबत वैभव नाईक काहीच बोलत नाहीत. शिवसेनेने व्हिजन नसलेला उमेदवार उभा केला आहे. कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात जांभई देण्यापलिकडे नाईक यांनी कोणत्याही मुद्यासाठी तोंड उघडलेले नाही. नारायण राणेंवर खोटे आरोप करणे, टीका करणे एवढेच त्यांचे काम आहे. १९९५ पासून नाईक कुटुंबियांकडून नारायण राणे यांनी जमिनी लाटल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, त्यांनी हे पुराव्यानिशी सिद्ध करावे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोदींमुळेच मते मिळाली होती. तर सन २००९ मध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघातून ४७ हजार मते मिळवूनही शिवसेनेने या मतदारसंघात साधा एक रस्ताही केलेला नाही. खासदार होऊन चार महिने उलटले तरीही विनायक राऊत यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्याचा फायदा नारायण राणे यांना होणार असून त्यांचे मताधिक्य वाढणार आहे. कणकवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून नीतेश राणे यांनी जनतेशी संपर्क साधून विश्वासार्हता निर्माण केली आहे. तर याउलट आमदार प्रमोद जठार यांनी निवडून आल्यानंतर कोणतीही विकासकामे केलेली नाहीत. तसेच त्यांनी जनतेशी संपर्कही ठेवलेला नसल्याचे मतदारांच्या भेटीच्यावेळी निदर्शनास येत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची सभा घेऊनही काँग्रेसच्या मताधिक्यावर काहीही परिणाम होणार नाही. सुरक्षा यंत्रणेकडून कासार्डे येथील सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. भाजपाकडून या सभेसाठी एस. टी. बुक करण्यात आल्या आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असून एस. टी. अभावी त्यांची गैरसोय झाली तर त्याबाबत एस. टी. च्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. सावंतवाडी मतदारसंघातून बाळा गावडेंसह जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात काँग्रेसला निश्चितच विजय मिळेल, असेही सावंत यांनी सांगितले. (वार्ताहर)
प्रचारासाठी सेना, भाजपाकडे मुद्दाच नाही
By admin | Updated: October 12, 2014 01:00 IST