माणगाव : माणगाव खोऱ्याचा संपूर्णत: कायापालट व विकासात्मक परिवर्तन होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील विरोधक केवळ काँग्रेसवर व माझ्यावर टीका करण्याचेच काम करतात. विकासाच्या बाबतीत बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. कारण विकासासाठी यांचा कधीही हातभार नसतो, असे प्रतिपादन काँग्र्रेसचे कुडाळ-मालवण मतदारसंघातील उमेदवार आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी माणगाव येथे केले. माणगाव येथील राधाकृष्ण हॉलमध्ये झालेल्या सभेत राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी माणगाव खोऱ्यातील साळगाव तसेच अन्य ठिकाणी कॉर्नर सभा व विविध गावांना भेटी देऊन गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा मुंज, सुनील भोगटे, प्रकाश मोर्ये, मधुकर भावे, अॅड. संग्राम देसाई, अॅड. किशोर शिरोडकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, पांडुरंग कोंडसकर, सरपंच सुनिता सावंत, प्रभाकर परब, विशाल परब, मोहन सावंत, अनिल कुडपकर, काका केसरकर, बच्चू नाईक, सचिन परब, श्रावण धुरी, बाळू भिसे, महेश भिसे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, गेल्या २५ वर्षात तुमच्यामुळे मला अनेक पदे मिळाली. या पदांचा वापर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचा प्रयत्न राहिला. भाजपवाल्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात शिवसेनेचे योगदान काय? असा सवाल करत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांना इथे या म्हणावं. इथे पूर, वादळं येतात. पण ते कधी येतात का? असा प्रश्न केला. मराठी माणसाची परिस्थिती बदलली नाही, पण ठाकरे यांची सुधारली, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)
विकासावर बोलण्याची हिंमत नाही
By admin | Updated: October 7, 2014 23:40 IST