चिपळूण : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने त्या आॅनलाईन झालेल्या नाहीत. परंतु, या ग्रामपंचायती कागदोपत्री आॅनलाईन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायती इंटरनेटच्या माध्यमातून थेट जोडल्या जाव्यात, असा शासनाचा आदेश आहे. परंतु, अनेक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज पुरवठा नाही. दूरध्वनीची व्यवस्था नाही. मग तेथे संगणक सुविधा किंवा इंटरनेट असणार कसे? असे असतानाही अशा ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी दाखले आता थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्याचा शासनाचा मनसुबा आहे. त्यासाठी २५ रुपये ग्रामपंचायत आकारणार आहे. परंतु, ग्रामपंचायतीमध्ये सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी योजना सक्षमपणे राबवावी, अशी मागणी केली जात आहे. चिपळूण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना आॅनलाईन सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यात या ग्रामपंचायतीच्या विकासविषयक वाटचालीवर थोडा परिणाम होत आहे. गावपातळीपर्यंत इंटरनेट पोहोचल्यानंतर ग्रामस्थांना झटपट दाखले मिळणे व अन्य गोष्टींसाठी सोय उपलब्ध झाली होती. मात्र, तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये ही सोय नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
अनेक ग्रामपंचायती आॅनलाईन नाहीत
By admin | Updated: October 16, 2014 00:06 IST